’अग्गोबाई, ढग्गोबाई, लागलीया कळ…’ आणि ‘कोण कोण वर्गामध्ये हात करा वर..’ अशी बालगीते प्रसिद्ध कवी संदीप खरे याने सादर केली आणि त्याच्या या आविष्कारावर खूश होत बालचमूने टाळ्यांचा ताल धरत जोरदार प्रतिसाद दिला.
घुमान येथे होणाऱ्या साहित्य संमेलनाबाबत जागरुकता घडविण्याच्या उद्देशातून ‘साहित्यिक आपल्या भेटीला’ या उपक्रमांतर्गत संदीप खरे याने टिळक रस्त्यावरील न्यू इंग्लिश स्कूलच्या विद्यार्थ्यांशी संवाद साधला. संमेलनाचे स्वागताध्यक्ष भारत देसडला, मुख्याध्यापक नागेश माने, पर्यवेक्षिका मनीषा मीनोचा या वेळी उपस्थित होत्या. विद्यार्थ्यांचे कलागुण हेरत संदीपने संतोष वाघमारे, उन्मेष हर्डीकर, अभिषेक हजारे या विद्यार्थ्यांकडून गाणी म्हणून घेतली.
साहित्य संमेलनातून विविध साहित्य प्रवाह एकत्र येण्याची पर्वणी साधली जात आहे. त्यामुळे हे संमेलन यशस्वी करण्यासाठी धडपडणाऱ्यांना समाजाने उत्स्फूर्त प्रतिसाद दिला पाहिजे, असे मत व्यक्त करीत संदीप म्हणाला,‘‘मराठीतील चांगल्या साहित्याची ओळख मुलांना करून देण्याची जबाबदारी मोठया व्यक्तींची आहे. त्यांनी मुलांसाठी वेळ काढला पाहिजे. नवीन माध्यमांबरोबरच मुलांना चांगली पुस्तके आणून दिली पाहिजेत. साहित्यिकांनीही थेट वाचकापर्यंत पोहोचून संवाद साधणे आवश्यक आहे.’’
घुमान येथे होणाऱ्या संमेलनाची माहिती किमान दोन लाख कुटुंबांपर्यंत पोहोचवून त्यांना निमंत्रण देण्यासाठी हा उपक्रम हाती घेतल्याचे भारत देसडला यांनी सांगितले.
संग्रहित लेख, दिनांक 14th Feb 2015 रोजी प्रकाशित
संदीपच्या बालगीतांनी बालचमू खूश!
घुमान येथे होणाऱ्या साहित्य संमेलनाबाबत जागरुकता घडविण्याच्या उद्देशातून ‘साहित्यिक आपल्या भेटीला’ या उपक्रमांतर्गत संदीप खरे याने टिळक रस्त्यावरील न्यू इंग्लिश स्कूलच्या विद्यार्थ्यांशी संवाद साधला.
First published on: 14-02-2015 at 02:55 IST
Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Conversation of sandeep khare with students