९४ ठिकाणी नाकाबंदी; रात्री १० ते पहाटे ५ पर्यंत संचारबंदी

पुणे : करोना रुग्णांच्या संख्येत वाढ झाल्याने शहरात पुन्हा कडक कारवाई करण्यास सुरुवात झाली आहे. प्रतिबंधित भागात ९४ ठिकाणी नाकाबंदी करण्यात आली असून शहरात रात्री १० ते पहाटे ५ या वेळेत संचारबंदीचे आदेश लागू करण्यात आले आहेत.

प्रशासन आणि पोलिसांनी पुन्हा कडक उपाययोजना हाती घेण्याचे निश्चित केले असून शहरातील विशेषत: प्रतिबंधित भागातील पोलीस बंदोबस्तात पुन्हा वाढ करण्यात आली आहे. रुग्णसंख्या वाढीस लागल्याने उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी गांभीर्याने दखल घेण्याची सूचना प्रशासकीय अधिकाऱ्यांना केली आहे. पवार यांनी बैठक आयोजित करून उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या आहेत. या पार्श्वभूमीवर शहरातील बंदोबस्तात पुन्हा वाढ करण्यात आली आहे. विशेषत: चौकाचौकात वाहतूक पोलिसांना तैनात करून नियमभंग करणाऱ्या वाहनचालकांना कारवाईच्या सूचना दिल्या आहेत. त्यानुसार गेल्या दोन ते तीन दिवसांत वाहतूक पोलिसांनी नियमभंग करणाऱ्या वाहनचालकांवर कारवाई सुरू केली आहे. शहरात कडक निर्बंध लागू झाल्यानंतर गेल्या तीन महिन्यांत शहरातील वेगवेगळ्या भागात पोलिसांनी अनावश्यक फिरणाऱ्या शहरातील ४८ हजार वाहनचालकांवर कारवाई करून त्यांची वाहने जप्त केली होती. ही वाहने जप्त करून पोलिसांनी पोलीस ठाण्याच्या आवारात लावली होती. टाळेबंदीत जप्त केलेली ४८ हजार वाहने बंधपत्र (बाँड) भरून घेऊन पुन्हा ताब्यात देण्याची प्रक्रिया नुकतीच पार पाडण्यात आली, अशी माहिती गुन्हे शाखेतील अतिरिक्त पोलीस आयुक्त अशोक मोराळे यांनी दिली.

गेल्या चार दिवसांतील कारवाई

* मुखपट्टी न वापरल्याप्रकरणी ७७८ जणांवर कारवाई

* कारणाशिवाय संचार – ९०१ पादचाऱ्यांवर कारवाई

* कारणाशिवाय संचार – ३३६ वाहनचालकांवर कारवाई

* कारवाईत २६२ वाहने जप्त

* निश्चित केलेल्या वेळेपेक्षा दुकाने खुली ठेवल्याप्रकरणी ४५ खटले

* दुकानात सामाजिक अंतर न पाळल्याप्रकरणी ३ खटले

अद्याप करोनाचा संसर्गाचा धोका कायम आहे. गेल्या चार दिवसांत २,४३२ जणांवर कारवाई करण्यात आली आहे. पुणेकरांनी स्वयंशिस्तीचे पालन करावे. यापुढील काळात कारवाई सुरूच राहणार आहे, तरी नागरिकांनी आरोग्य विभागाने दिलेल्या सूचनांचे पालन करणे गरजेचे आहे. नागरिकांनी मुखपट्टीचा वापर करावा. सामाजिक अंतराचे पालन करावे तसेच अनावश्यक गर्दी करू नये.

– डॉ. के. वेंकटेशम, पोलीस आयुक्त, पुणे</strong>

हिंजवडी, मारुंजी परिसर आजपासून आठ दिवस बंद

पिंपरी : करोना विषाणूंचा संसर्ग रोखण्यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून ९ जुलै (गुरुवार) ते १६ जुलै दरम्यान आठ दिवस हिंजवडी, मारुंजीसह लगतच्या परिसरात बंद पाळण्यात येणार आहे. या भागातील आयटी कंपन्यांना मात्र बंदमधून सूट देण्यात आली आहे.

करोनाचा प्रादुर्भाव आणखी वाढू नये म्हणून हिंजवडी परिसरातील ग्रामपंचायती तसेच ग्रामस्थांनी एकत्र येऊन बंद पाळण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार, ९ ते १६ जुलैपर्यंतच्या काळात हिंजवडी, मारुंजी आणि लगतच्या भागातील सर्व दुकाने बंद राहणार आहेत. दूध, मेडिकल आणि दवाखाने सुरू राहतील. मात्र, इतर व्यवसाय बंदच राहतील. या कार्यक्षेत्रातील आयटी कंपन्या तसेच या भागात सुरू असलेली बांधकामे सुरूच राहतील, असे स्पष्ट करण्यात आले आहे. नागरिकांना घरीच राहा आणि सुरक्षित राहा, असे आवाहन ग्रामस्थांनी केले असून मुखपट्टीचा वापर न करणाऱ्यांना ५०० रुपये दंड करण्यात येईल, असा इशाराही देण्यात आला आहे.

करोना प्रतिबंधासाठी खबरदारीचा उपाय म्हणून ९ ते १६ जुलै दरम्यान बंद पाळण्यात येणार आहे. अत्यावश्यक सेवा वगळता इतर दुकाने बंदच राहणार आहेत. आयटी कंपन्या व बांधकामांना सूट देण्यात आली आहे. नागरिकांनी सहकार्य करावे.

– पूनम बुचडे, सरपंच, मारुंजी

करोनाचा प्रादुर्भाव वाढतो आहे. तरी नागरिक विनाकारण घराबाहेर पडत आहेत. अशी परिस्थिती असलेल्या १६ गावांच्या ग्रामपंचायतींनी मिळून स्वंयस्फूर्तीने हा निर्णय घेतला आहे. अत्यावश्यक सेवांसह सरकारी आस्थापना, आयटी कंपन्या सुरू राहणार आहेत.

– संदेश शिर्के, प्रांत, मावळ