करोना विषाणू  प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर आमच्याकडे नागरिकांच्या अनेक प्रकारच्या तक्रारी येत आहेत. ज्याप्रमाणे प्रशासनाकडून आता शेतकरी वर्गासाठी बाजार भाव, हवामानाची माहिती मोबाइलवर एसएमएसद्वारे देण्यात येते. त्यानुसार करोना संदर्भातील किती रुग्ण आणि कोणत्या रूग्णालयात किती बेड शिल्लक आहेत. याबाबतची प्रत्येक गोष्टीची माहिती नागरिकांना मोबाइलवर एसएमएसद्वारे देण्यात यावी, अशी सूचना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा आणि माजी केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांनी केली आहे.

पुण्यातील विधान भवन आणि स्मार्ट सिटीच्या कार्यालयात  शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली करोना विषाणू संसर्ग व केल्या जात असलेल्या उपाययोजनांच्या पार्श्वभूमीवर बैठक पार पडली. या बैठकीला उपमुख्यमंत्री अजित पवार, गृहमंत्री अनिल देशमुख, आरोग्य मंत्री राजेश टोपे, महापौर मुरलीधर मोहोळ, महापालिका आयुक्त शेखर गायकवाड, अतिरिक्त आयुक्त रुबल अग्रवाल तसेच आरोग्य विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

यावेळी, कोरोना विषाणूचा प्रसार थांबविण्यासाठी स्थानिक प्रशासनाने लोकप्रतिनिधींना सोबत घेवून त्यांनी केलेल्या योग्‍य सूचनांचे तंतोतंत पालन करावे, असे निर्देश उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी दिले.

कोरोनाच्‍या लढाईत पुणे महानगरपालिकेने आर्थिक भार सहन केला आहे. याबाबत मुख्यमंत्र्यांशी चर्चा करुन योग्य निर्णय घेण्यात येईल. कोरोना प्रतिबंधासाठी कॅन्टोन्मेंट बोर्डसाठी आणखी एक कोटी रुपयांचा निधी देण्‍यात येत असल्‍याचे त्‍यांनी सांगितले. सर्वांनी समन्‍वयाने काम केल्यास आपण कोरोनाची लढाई निश्चितपणे जिंकू, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.

यावेळी महापालिका आयुक्त शेखर गायकवाड यांनी शहरातील करोना विषाणूची सध्य परिस्थितीचा आढावा, शरद पवार यांच्या समोर मांडला. तर या दरम्यान आवश्यक, त्या उपाययोजना करण्याच्या सूचना शरद पवार यांनी अधिकार्‍यांना दिल्या.