पुणे : पुणे, पिंपरी आणि परिसरात शुक्रवारी दिवसभरात ६८ नवीन रुग्णांची नोंद करण्यात झाली आहे. त्यांपैकी पुणे महापालिका क्षेत्रात ५७ तर पिंपरी-चिंचवड महापालिका शहरात चार, पुणे ग्रामीणमध्ये एक तर पुणे छावणी परिसरात सहा नवे रुग्ण आढळले. दिवसभरात चार रुग्णांचा करोनामुळे मृत्यू झाला, त्यामुळे पुणे, पिंपरी आणि परिसरातील मृतांची संख्या ५१ झाली आहे.

विभागीय आयुक्त कार्यालयाकडून शुक्रवारी संध्याकाळी ही माहिती देण्यात आली आहे. नव्या रुग्णांमध्ये ससून रुग्णालयातील एका डॉक्टरचाही समावेश आहे.

पिंपरी-चिंचवडमधील नव्या रुग्णांमध्ये तीन पुरुष आणि एका महिलेचा समावेश आहे. हे चारही रुग्ण एका करोनाग्रस्ताच्या संपर्कात आले होते, त्यामुळे त्यांना देखील या संसर्गाची लागण झाली आहे. शुक्रवारी दगावलेल्या रुग्णांमध्ये उच्च रक्तदाबाने ग्रासलेल्या ३० वर्षीय पुरुषाचा तर अल्कोहोलजन्य यकृतविकाराच्या ४४ वर्षीय पुरुष रुग्णाचा समावेश आहे. हृदयविकाराची पाश्र्वभूमी असलेल्या ६८ वर्षीय महिलेचा देखील करोनामुळे मृत्यू झाला. पुणे महापालिका क्षेत्रातील ३३ तर पिंपरी-चिंचवड महापालिका क्षेत्रातील १३ रुग्ण संपूर्ण बरे होऊन घरी परतले आहेत.