करोनाच्या प्रादुर्भावामुळे अनेक नागरिक गर्दी टाळत आहेत. त्याचा परिणाम रेल्वेत पहायला मिळत आहे. दररोज सिंहगड एक्सप्रेस आणि डेक्कन क्वीन या दोन गाड्यांना मोठ्या प्रमाणावर गर्दी असते. मात्र, आज दोन्ही गाड्यांमध्ये शुकशुकाट पहायला मिळत होता. करोनाची लागण होऊ नये यासाठी राज्य सरकारने केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत लोक घरुन काम करण्याला प्राधान्य देताना दिसत आहेत. पिंपरी-चिंचवडमध्ये करोनाची लागण झालेल्यांचा आकडा १० वर येऊन ठेपला आहे. त्यामुळे नागरिक काळजी घेत आहेत.

सिंहगड एक्सप्रेस ही पुण्यातून सहा वाजण्याच्या सुमारास सुटते. तर डेक्कन क्वीन सव्वा सात वाजता मुंबईच्या दिशेने रवाना होते. पुण्याहून मुंबईला आणि इतर ठिकाणी कामाला असणाऱ्या नागरिकांची संख्या मोठ्या प्रमाणावर आहे. एरव्ही, या दोन्ही ट्रेनमध्ये बसायला कवायत करावी लागायची. परंतु, पुणे आणि पिंपरीत करोनाचे रुग्ण सापडल्याने रेल्वेतदेखील याचा परिणाम पहायला मिळत आहे. आज दोन्ही ट्रेनमध्ये रेल्वे प्रवाशी अत्यंत कमी असून शुकशुकाट दिसत होता. दरम्यान गर्दी टाळण्यासाठी रेल्वे प्रशासनाने अनेक गाड्या रद्दही केल्या आहेत.

पिंपरी-चिंचवड शहरात एकूण १० जणांना करोनाची बाधा झाली असून त्यांच्यावर यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालय आणि भोसरी येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या सर्वांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती महानगर पालिका प्रशासनाने दिली आहे. बहुतांश, परदेशातून शहरात परतलेल्या नागरिकांना करोनाची बाधा झालेली आहे. करोनाचा संसर्ग होऊ नये म्हणून नागरिकांनी बाहेर पडणे टाळावे, गर्दीत जाऊ नये असे वारंवार आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे.