मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील अनधिकृत बांधकामे नियमित करण्याची घोषणा केली आणि भाजपने पिंपरीत एकटय़ानेच त्याचे श्रेय घेण्याचा प्रयत्न चालवल्याचे पाहून शिवसेनेसह अन्य राजकीय पक्षांमध्ये अस्वस्थता पसरली आहे. हा युती सरकारचा निर्णय असून जनतेच्या लढय़ाचे यश असल्याचे सांगून शिवसेनेनेही याप्रकरणी पाठपुरावा केल्याचे स्पष्ट केले आहे. त्यातच, आता या श्रेयवादात काँग्रेस व राष्ट्रवादीनेही उडी घेतली आहे. आगामी निवडणुका डोळ्यासमोर ठेवून हा निर्णय घेतल्याची टीका भाजपवर चहूबाजूने होऊ लागली आहे.
मुख्यमंत्र्यांनी अनधिकृत बांधकामे नियमित करण्यात येतील, अशी घोषणा केली, तेव्हापासून भाजपने जल्लोष, मिठाईवाटप, सत्कार, होर्डिगबाजी करत या निर्णयाचे श्रेय घेण्याचा पुरेपूर प्रयत्न चालवला आहे. शिवसेनेने हा निर्णय म्हणजे युती सरकारने जनतेसाठी घेतलेला चांगला निर्णय असल्याचे सांगत याबाबतच्या श्रेयावर दावा केला आहे. शनिवारी खासदार श्रीरंग बारणे व आमदार गौतम चाबुकस्वार यांनी घाईने पत्रकार परिषद घेऊन आतापर्यंत केलेल्या पाठपुराव्याची जंत्री सादर केली. ही श्रेयवादाची लढाई नाही. कोणी श्रेय घ्यायचे हा ज्याचा-त्याचा भाग आहे. शिवसेनेला श्रेयासाठी भांडायचे नाही, असे सांगत बारणे व चाबुकस्वार यांनी विविध आंदोलनांचा व पत्रव्यवहारांचा दाखला दिला. आतापर्यंत अनधिकृत बांधकामांच्या शिक्क्य़ांमुळे मातीमोल ठरलेल्या मिळकती आता लाखमोलाच्या होणार आहेत, असे सांगत सर्वसामान्यांचे हित साधणाऱ्या या चांगल्या निर्णयात कोणी खुसपट काढू नये, अशी टिप्पणी भाजप शहराध्यक्ष लक्ष्मण जगतापांनी निवेदनाद्वारे केली आहे. तर, शिर्डीत पत्रकारांनी बोलताना काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी, अनधिकृत बांधकामे नियमित करण्यासाठी नियुक्त केलेली सीताराम कुंटे समिती पृथ्वीराज चव्हाण यांनी नियुक्त केली होती. समितीने पाहणी करून याबाबतचा अहवाल तयार केला व त्यानुसार सरकारने निर्णय जाहीर केला, याकडे लक्ष वेधले. राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे यांनी, हा प्रश्न सोडवण्यासाठी कित्येक वर्षांपासून राष्ट्रवादीनेच पाठपुरावा केला होता, असा दावा केला आहे. या प्रश्नासाठी अजितदादांनी तत्कालीन मुख्यमंत्र्यांनाही सुनावले होते, याकडे त्यांनी लक्ष वेधले.