शासकीय कारभारामध्ये एखादे काम होण्यासाठी केवळ नागरिकांनाच सातत्याने पाठपुरावा करावा लागतो असे नाही, तर एका शासकीय खात्याला दुसऱ्या खात्याकडेही खूप पाठपुरावा करावा लागतो. महापालिकेच्या मुद्रणालयाकडून पीएमपीकडे असा पाठपुरावा गेली तब्बल सोळा वर्षे सुरू होता आणि अखेर या पाठपुराव्याला यश आले आहे. पीएमपीच्या तिकीटछपाईपोटी असलेली कोटय़वधींची थकबाकी मिळावी यासाठी हा पाठपुरावा सुरू होता आणि ही थकबाकी आता वसूल व्हायला सुरुवात झाली आहे.
महापालिकेच्या मुद्रणालयातून पीएमपीला तिकिटे छापून दिली जातात. पीएमपीकडून दरमहा तशी मागणी मुद्रणालयाकडे नोंदवली जाते आणि त्यानुसार हे सर्व काम वेळेत व पूर्ण सुरक्षितता राखून करून देण्याची जबाबदारी मुद्रणालयावर असते. तिकीट छपाईपोटी होणारे बिल पीएमटीकडून पूर्वी दरवर्षांला दिले जात असे. मात्र सन १९९०-९१ पासून दरवर्षी तिकीट छपाईची रक्कम देण्याचे पीएमटीने थांबवले. त्यानंतर सहा वर्षांपूर्वी स्थापन झालेल्या पीएमपीनेही तोच कित्ता गिरवत फक्त तिकिटांची छपाई करून घ्यायची, पैसे मात्र द्यायचे नाहीत, असा प्रकार पुढे सुरू ठेवला. दरवर्षी ही रक्कम थकत गेल्यामुळे पीएमपीकडून महापालिका मुद्रणालयाला आतापर्यंत येणे असलेली रक्कम २० कोटी २५ लाख एवढी झाली आहे.
ही रक्कम मिळण्यासाठी मुद्रणालयाचे व्यवस्थापक जयंत पवार गेली अनेक वर्षे पीएमपीकडे सातत्याने पाठपुरावा करत होते. महापालिका आयुक्तपदी जे जे अधिकारी आले त्यांना प्रत्येकवेळी ही रक्कम वसूल करणे कसे आवश्यक आहे हे त्यांनी पटवून दिले होते. त्यानुसार महापालिका पीएमपीला दरवर्षी जे अनुदान देते त्यातून ही रक्कम वळती करून घ्यावी असा प्रस्ताव तत्त्वत: मान्यही होत असे. प्रत्यक्षात मात्र गेल्या पंधरा-सोळा वर्षांत अशी रक्कम वळती करून घेण्यात आली नाही. महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त ओमप्रकाश बकोरिया यांच्याकडे पीएमपीचे अध्यक्ष व कार्यकारी संचालक असा पदभार सध्या असून पवार यांनी त्यांनाही ही बाब गेल्या महिन्यात निदर्शनास आणून दिली होती. त्यांनी ही वसुली करण्याबाबत प्रत्यक्ष कार्यवाही केली आणि आता या थकबाकीचा पहिला हप्ता म्हणून महापालिका मुद्रणालयाला एक कोटी ४० लाख रुपये देण्याचा ठराव मंजूर झाला आहे. तेवढी रक्कम वळती करूनच पीएमपीला अनुदान दिले जाणार आहे.
विक्रमी तिकीट छपाई
सन २०१४-१५ या वर्षांत महापालिका मुद्रणालयाने पीएमपीला ३२ कोटी तिकिटे छापून दिली आणि ही आतापर्यंतची सर्वोच्च तिकीट छपाई ठरली आहे. त्यात प्रामुख्याने पाच, दहा आणि पंधरा रुपयांच्या तिकिटांची छपाई मोठय़ा प्रमाणावर करून दिली जात असल्याचे मुद्रणालयाचे व्यवस्थापक जयंत पवार यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना सांगितले. सध्या दरमहा सरासरी अडीच कोटी तिकिटे पीएमपीला छापून दिली जात असून गेल्या वर्षी महापालिकेच्या मुद्रणालयात पीएमपीने जेवढी छपाई करून घेतली त्याचे बिल चार कोटी २५ लाख इतके झाले.