आठ मोटारी ताब्यात; अनेकांची फसवणूक केल्याचा संशय

कॉलसेंटरमध्ये मोटारी भाडेतत्त्वावर लावण्याचे आमिष दाखवून फसवणूक करणाऱ्या टोळीला गुन्हे शाखेकडून अटक करण्यात आली. त्यांच्याकडून आठ मोटारी जप्त करण्यात आल्या आहेत.

राजू चंद्रकांत टिळेकर (वय ३४,  रा. एसएमएस कॉलनी, दापोडी)त्याचे साथीदार रमेश मंगेश चव्हाण (वय ३४, ) आणि योगेश बाळकृष्ण टोणपे (वय ३०, रा. ) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. कॉलसेंटरमध्ये भाडेतत्त्वावर गाडी लावण्याचे आमिष दाखविणाऱ्या टोळीचा सूत्रधार राजू टिळेकर आहे. त्याने बनावट नावाने टूर्स आणि ट्रॅव्हल्स कंपनी स्थापन केली होती. त्याने बनावट करारनामे करुन दरमहा तीस हजार रुपये भाडे देण्याचे आमिष दाखवून मोटारी ताब्यात घेतल्या. त्याचे साथीदार चव्हाण आणि टोणपे यांच्याशी संगनमत करुन परस्पर मोटारींची विक्री केली, अशी तक्रार गुन्हे शाखेच्या संघटित गुन्हेगारी विरोधी पथकाकडे आली होती. त्यानुसार पोलिसांनी टिळेकर आणि  चव्हाण, टोणपे यांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून पंचेचाळीस लाख रुपये किमतीच्या आठ मोटारी जप्त करण्यात आल्या आहेत. त्यापैकी तीन मोटारी सोलापूर येथील रहिवाशी सचिन पडोळकर यांच्या मालकीच्या आहेत. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरुन तिघांविरुद्ध हिंजवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी त्याच्याविरुद्ध शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलीस निरीक्षक लक्ष्मण बोराटे, सहायक निरीक्षक रणजित भोईटे, उपनिरीक्षक पोपटराव गायकवाड, अब्दुल सय्यद, राजेंद्र शिंदे, मयूर शिंदे, तानाजी कांबळे, रमेश भिसे, कांता बनसुडे, सचिन जाधव, शैलेश नाईक, अमित जाधव यांनी ही कारवाई केली.