करोना विषाणूवरील लस तयार करण्यासाठी ‘वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषद’ (सीएसआयआर) प्रयत्नशील आहे. दोन प्रकारच्या लसी दोन वेगवेगळ्या कंपन्यांच्या सहकार्याने तयार करण्यासाठीचे काम ‘सीएसआयआर’कडून युद्धपातळीवर सुरू आहे. त्यातील एका लसीच्या वैद्यकीय चाचण्या दोन ते तीन दिवसांत सुरू होणार आहेत.

‘सीएसआयआर’चे महासंचालक डॉ. शेखर मांडे यांनी ही माहिती दिली. सध्या करोना विषाणूचा संसर्ग जगभरातील अनेक देशांमध्ये पसरला आहे. भारतातही संसर्ग वाढत असल्याने देशभरातील टाळेबंदी ३ मेपर्यंत वाढवण्यात आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशभरातील वैज्ञानिकांना करोनावरील लस शोधण्याचे आवाहन केले आहे. या पार्श्वभूमीवर, ‘सीएसआयआर’ने दोन लसी तयार करण्याच्या दिशेने पाऊल टाकले आहे.

लसनिर्मितीबाबत माहिती देताना डॉ. मांडे म्हणाले, की दोन कं पन्यांच्या सहकार्याने लसनिर्मिती करण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. त्यातील एक लस ‘एमडब्ल्यू’ नावाची आहे. ही लस कुष्ठरोगावरील (लेप्रसी) उपचारांसाठी प्रचलित आहे. मात्र, ही लस करोना विषाणू संसर्गातील उपचारासाठीही वापरली जाऊ शकेल काय, हे तपासले जात आहे. त्यासाठीची वैद्यकीय चाचणी दोन ते तीन दिवसांत सुरू करण्यात येईल. तर, दुसरी लस करोना विषाणूचे घटक निष्क्रिय करण्याच्या दृष्टीने वापरता येऊ शकते.