वरसगाव धरणही शंभर टक्के भरले

शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या टेमघर, वरसगाव, पानशेत आणि खडकवासला या चार धरणांमधील पाणीसाठा ९५ टक्क्य़ांवर पोहोचला आहे. खडकवासला, पानशेतनंतर वरसगाव धरणही गुरूवारी सायंकाळी शंभर टक्के भरले आहे. त्यामुळे चारही धरणांमधून पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे.

गेल्या काही दिवसांपासून दडी मारलेल्या पावसाने मागील आठवडय़ापासून जोरदार पुनरागमन केले आहे. त्यामुळे चारही धरणात मिळून एकूण २७.६२ टीएमसी एवढा पाणीसाठा झाला आहे. टेमघर धरणक्षेत्रांत दिवसभरात २१, वरसगाव तीन, पानशेत चार आणि खडकवासला धरण परिसरात दोन मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. टेमघर धरणाची दुरूस्ती करण्यात येणार असल्याने हे धरण पूर्ण क्षमतेने भरण्यात येणार नाही. सध्या या धरणात २.१७ टीएमसी म्हणजेच ५८.६० टक्के एवढा पाणीसाठा या धरणात झाला आहे. उर्वरित तीन प्रमुख धरणे शंभर टक्के भरल्याने खडकवासला धरणातून मुठा नदीपात्रात ४ हजार २८०, पानशेत ३ हजार ९०८, वरसगाव धरणातून एक हजार ७७७ क्युसेकने पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे. धरण परिसरात असाच पाऊस सुरू राहिल्यास पाण्याचा विसर्ग वाढविण्यात येणार आहे, अशी माहिती जलसंपदा विभागाकडून देण्यात आली आहे. दरम्यान, जिल्ह्य़ातील प्रमुख धरणांपैकी पवना, आंद्रा, वडीवळे, चासकमान आणि कळमोडी धरणे शंभर टक्के भरली आहेत. तर, भामा आसखेड ९२ टक्के, मुळशी ९९ टक्के आणि उजनी केवळ ४१ टक्के एवढे भरले आहे.

शहरासह जिल्ह्य़ाला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये समाधानकारक पाणीसाठा झाला आहे. मात्र, अद्यापही बारामती तीन आणि दौंड व पुरंदर तालुक्यांमध्ये प्रत्येकी एक असे एकूण पाच टँकर सुरू आहेत. तीन तालुक्यांमध्ये मिळुन एकूण साडेनऊ हजार बाधित नागरिकांना टँकरने पाणी पुरवण्यात येत आहे.