पश्चिम महाराष्ट्रातील मोठय़ा भागात गेल्या वर्षी मुसळधार पाऊस आणि महापुराने शेतीलाही बुडवले होते. या पार्श्वभूमीवर यंदा पावसाने सुरुवात चांगली केली. सोलापूर, सातारा, सांगली आणि नगर जिल्ह्य़ातील दुष्काळी भागातही यंदाचा खरीप चांगलाच साधला. पिके जोमात आलेली असतानाच यंदा पुन्हा घात झाला आणि हातातोंडाशी आलेला हा घास परतीच्या चरणातील अतिवृष्टीने हिरावून घेतला. खरीपातील ज्वारी, बाजरी, भुईमूग, घेवडा, सोयाबीन, कांदा, बटाटा आदी पिके शेतातच खराब झाली आहेत. डाळिंब, द्राक्षासारख्या बागायती क्षेत्रालाही या अतिरिक्त पावसाचा फटका बसला आहे. या पावसाने सिंचनाचा प्रश्न मिटला असून त्यामुळे यंदा दुष्काळी भागाला आणि रब्बी हंगामाला काहीसा दिलासा मिळण्याची आशा आहे.

पुणे जिल्ह्य़ात शेतकऱ्यांनी खरिपात साधारणपणे तीन हजार हेक्टर क्षेत्रावर बाजरीचे पीक घेतले आहे. मात्र, पीक काढणीला आलेले असतानाच होत असलेल्या संततधार पावसाने बाजरीचे मोठे नुकसान झाले आहेत. गेल्या १५ दिवसांपासून जिल्ह्य़ाच्या ग्रामीण भागात पाऊस पडत आहे. पावसामुळे शेतांमध्ये पाणी साचल्याने पिके  पिवळी पडू लागली आहेत. ऊस, मका, बाजरीसह भुईमूग, सोयाबीन, उडीद, चवळी, मूग, वाल आदी कडधान्य व भाजीपाला पिके  पिवळी पडून वाया जात आहेत. जिल्ह्य़ातील खेड, शिरूर, आंबेगाव, बारामती तालुक्यात हे नुकसान मोठय़ा प्रमाणात आहे. आंबेगावमधील बटाटा खराब झाला आहे. अनेक तालुक्यातील नवीन कांदा लागवडीमध्ये पाणी साचल्याने रोपे खराब झाली आहेत.

काढणीच्या पिकांना फटका

सातारा जिल्ह्य़ात सुरुवातीला पडलेल्या चांगल्या पावसाने खरिपाची जोमाने झालेली वाढ पुढे परतीच्या वेळी झालेल्या अतिरिक्त पावसाने धोक्यात आली आहे. कायम दुष्काळी असणाऱ्या माण, खटाव तालुक्यामध्ये यंदा कधी नव्हे ते खरीप साधला होता. कोरेगाव, खंडाळय़ात बटाटा, घेवडा, वाटाण्याचे पीक जोमात आले होते. या उभ्या पिकाचे परतीच्या पावसाने नुकसान केले आहे. जिल्ह्यातील सोयाबीन काढणी, मळणी संकटात आहे. भुईमूग जमिनीतच खराब झाला आहे. काढणीला आलेली ज्वारी, बाजरी काळी पडली आहे. हीच परिस्थिती भाजीपाल्याच्या उत्पादनाचीही आहे. वाई, जावळी, महाबळेश्वर तालुक्यामध्ये स्ट्रॉबेरीची रोपेच सततच्या पावसामुळे तयार झाली नाहीत.

सोलापुरात पिकांचे नुकसान

सोलापूर जिल्ह्यात पंढरपूर, बार्शी, माळशिरस, मंगळवेढा, सांगोला व दक्षिण सोलापूर तालुक्यांमध्ये यंदा अतिरिक्त पावासामुळे ११ हजार २१ हेक्टर क्षेत्रातील पिकांची हानी झाली आहे. २४९१ हेक्टर क्षेत्रावरील फळपिकांची नासाडी झाली तर १९३८ हेक्टर क्षेत्रात ऊ सपिकाचे नुकसान झाले आहे. यंदा खरीप हंगामात जून व जुलैमध्ये पावसाने चांगली साथ दिल्यामुळे शेतांमध्ये बहरलेली पिके काढणीला आली असतानाच मुसळधार पावसाने कहर केला. त्यामुळे शेतकऱ्यांच्या हाती आलेला घास हिरावला गेला.

नगरमध्ये दुप्पट पाऊस

विक्रमी खरीप पेरणी होणाऱ्या नगर जिल्ह्यालाही यंदाच्या या संततधार पाऊस, ढगाळ हवामान, हवेतील आद्र्रतेने फटका दिला आहे. जिल्ह्याची पावसाची सरासरी ४५० मिलिमीटर एवढी आहे. परंतु यंदा सरासरीच्या दुप्पट पाऊस झाला आहे. काही भागात तर ११०० ते १२०० मिलिमीटर पाऊस झाला आहे. जिल्ह्यात ६ लाख ३५ हजार हेक्टर क्षेत्रात खरीप पेरणी झाली. त्यात मूग, उडिदाचा वाटा मोठा होता. यातील बहुतांश मूग सडून गेला आहे. काढणीला आलेले सोयाबीन, मका व बाजरी शेतातच काळी पडली आहे. कपाशीची पातेगळ झाली. खरीप कांदा पाण्यात आहे. एकूणच खरिपाचे भवितव्य धोक्यात आहे.  या पावासाचा फटका डाळिंबाच्या बागांनाही बसला आहे. एकूणच यंदा सुरुवातीच्या पावसाने पीक आणले पण शेवटच्या चरणातील संततधारेने तोंडातला घास हिरावला आहे.

कोल्हापूरला यंदा दिलासा : गेल्या वर्षी महापूर अनुभवलेल्या कोल्हापूरला यंदा पीकपाण्यासाठीही पावसाचा दिलासा मिळाला आहे. जिल्ह्यातील ऊ स हे मुख्य पीक आहे. तसेच खरिपामध्ये भात, भुईमूग आणि सोयाबीनचे पीक घेतले जाते. यंदा टप्प्याटप्प्याने आणि योग्य वेळी पाऊस झाल्याने पिकांची उगवण चांगली झाली. मात्र, अलीकडेच पाणलोट क्षेत्रात झालेल्या जोरदार पावासाने काही भागातील भात, सोयाबीन पिकाचे नुकसान झाले आहे. मात्र हे नुकसान अल्प असल्याने एकूणच यंदाचा पाऊस शेतकऱ्यांसाठी दिलासा देणारा ठरला आहे. करोनामुळे बिघडलेल्या ग्रामीण अर्थकारणाला यंदा शेतीचा आधार मिळण्याची शक्यता आहे.

सांगलीत बागा बुडाल्या

* सांगली जिल्ह्य़ात मागील वर्षी महापुराने शेतीचे मोठे नुकसान केले होते. मात्र यंदा पावसाने समतोल राखल्याने जिल्ह्य़ातील बागायती तसेच दुष्काळी भागातील पिकेही जोमदार आली होती.

* मात्र पिके काढणीला आलेली असतानाच पावसाने घातलेल्या धुमाकुळीने पिकांची प्रचंड हानी झाली. मूग, उडीद, भुईमूग, बाजरी या पिकांची काढणीही करता आली नाही.

* सोयाबीनच्या शेंगांना वेलीवर कोंब आले, तर मृग बहारातील डाळिंबाच्या बागाही मातीमोल झाल्या आहेत. विशेषत: दुष्काळी भागात बहरलेल्या डाळिंब, द्राक्ष बागांना या अतिरिक्त पावसाचा मोठा फटका बसला आहे.

* या जादाच्या पावसाने यंदा दुष्काळाची तीव्रता कमी भासेल, तसेच रब्बी हंगामाला फायदा होईल.