साखरझोपेत असताना भल्या पहाटेच आलेली जाग.. सुवासिक उटणे आणि सुगंधी तेल लावून केलेले अभ्यंगस्नान.. परिधान केलेले नवे कपडे.. घरातील लहान-मोठय़ांनी एकत्र बसून केलेला फराळ.. मुलांसमवेत फटाके उडविण्यामध्ये घेतलेला सहभाग.. पालकांसमवेत जाऊन केलेले देवदर्शन.. अशा एके काळी घरगुती स्वरूपाच्या असलेल्या दिवाळीचा प्रवास शहरामध्ये विविध ठिकाणी होत असलेल्या सशुल्क आणि विनामूल्य ‘दिवाळी पहाट’ कार्यक्रमांमुळे सांस्कृतिकते कडे झाला आहे. भल्या पहाटे नटून-थटून दिवाळी कार्यक्रमांचा आस्वाद घेत मनोरंजनाचा फराळ करण्याकडे कल वाढताना दिसून येत आहे.
घरातील सर्वाना आलेली जाग, घरोघरी पणत्यांनी प्रज्वलित केलेले अंगण, अंधार दूर करून परिसर प्रकाशमान करणारा आकाशकंदील हे एकेकाळच्या वाडय़ामध्ये राहणाऱ्या नागरिकांचे वैशिष्टय़ होते. कांडी कोळसा बंबात घालून अभ्यंग स्नानासाठी तापविण्यात येणारे पाणी, पाणी कढत होईपर्यंत अंगाला तेल लावून केले जाणारे मर्दन, स्नान सुरू असताना मध्यावर उडविली जाणारी फुलबाजी हे वातावरण आता इतिहासजमा झाले आहे. बंबाची जागा आता हिटर आणि गिझरने घेतली आहे. आकाशवाणी पुणे केंद्रावरून प्रसारित होणारे नरकासुराच्या वधाचे कीर्तन ऐकताना अभ्यंगस्नान करण्याची मौज हरवली आहे. अभ्यंगस्नान झाल्यानंतर नवे कपडे परिधान करताना त्या कपडय़ांचा वास मोहवून टाकायचा. चकली, चिवडा, लाडू, करंजी, शंकरपाळी, कडबोळी असे फराळाचे पदार्थ एकत्रितपणे खातानाची लज्जत आता विभक्त कुटुंबपद्धतीमुळे काहीशी विभागली गेली आहे. घरामध्ये कमावती व्यक्ती एकच असल्याने फटाके विकत घेण्यावरही मर्यादा असायची. प्लॅस्टिक पिशवीमध्ये शेकडय़ाने मिळणारी पानपट्टी आणि लवंगी माळेतील एक-एक फटाका सुटा करून मुलांसमवेत उडविताना पालकही आपले बालपण नव्याने अनुभवायचे. फटाके उडवून झाल्यानंतर कसबा गणपती, तांबडी जोगेश्वरी, दगडूशेठ हलवाई गणपती, गुंडाचा गणपतीचे दर्शन घेतले जात होते. किल्ला करण्यामध्ये गुंतलेली मुले आणि दुपारी पक्वान्नाचे भोजन असा दिवाळीचा थाट अनुभवतानाही आनंदाची पर्वणी होती.
भल्या पहाटे मैफल
मुंबई येथील चतुरंग संस्थेने दिवाळी पहाट कार्यक्रमाची मुहूर्तमेढ रोवली. त्याचे अनुकरण करीत पुण्यामध्ये त्रिदल पुणे संस्थेने नरक चतुर्दशीला आणि संवाद-पुणे संस्थेने पाडवा पहाट कार्यक्रमांची सुरुवात केली. गेल्या काही वर्षांपासून यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानचा पुणे विभाग आणि मराठी भाषा संवर्धन प्रतिष्ठान यांच्यातर्फे सारसबागेच्या हिरवळीवर दिवाळी पहाट कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. भल्या पहाटे शब्द-सूर-काव्य-अभिनय अशा विविध कलांचा गुच्छ असलेली मैफल अनुभवण्याला पुणेकरांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. दिवाळी पहाट कार्यक्रमांना मिळणारा उदंड प्रतिसाद ध्यानात घेऊन राजकीय व्यक्तींनीदेखील या प्रांतामध्ये उडी घेतली आणि उद्यानांचे शहर असलेल्या पुण्यातील वेगवेगळ्या उद्यानांमध्ये दिवाळी पहाट कार्यक्रम रंगत आहेत. अभिजात शास्त्रीय संगीताचे महोत्सव शहरामध्ये होत असताना दिवाळी पहाट कार्यक्रमांमध्ये रसिक शास्त्रीय आणि सुगम संगीताचा आनंद लुटत आहेत. राज्यातील दुष्काळाच्या पाश्र्वभूमीवर यंदा गणेशोत्सवामध्ये फारसे कार्यक्रम नसलेल्या कलाकारांची दीपोत्सवामध्ये खऱ्या अर्थाने दिवाळी झाली आहे, याकडे मनोरंजन संस्थेचे मोहन कुलकर्णी यांनी लक्ष वेधले.