पादचारी सुरक्षा योजना देखाव्यापुरतीच; रस्ता ओलांडण्यासाठी आखलेले पट्टे गायब

गेल्या चार महिन्यात शहरात झालेल्या वेगवेगळ्या अपघातांमध्ये २० पादचाऱ्यांना प्राण गमवावे लागले. सातत्याने अपघात होत असूनही पादचारी सुरक्षेसाठी ठोस असे पाऊले उचलली गेलेली नाहीत. त्यामुळे पादचारी सुरक्षा योजना केवळ देखाव्यापुरती आणि कागदावरच राहिली असून रस्ते अपघातात निष्पापांचे बळी जात असल्याचे वास्तव सातत्याने समोर येत आहे.

शहरातील अनेक प्रमुख चौकांमध्ये पादचाऱ्यांना रस्ता ओलांडण्यासाठी आखण्यात आलेले पट्टे पुसट झाले आहेत, तर काही ठिकाणी हे पट्टे पूर्णत: पुसले गेले आहेत. पादचाऱ्यांसाठी लावण्यात आलेले सर्व सिग्नल बंद आहेत. शहरातील नगर रस्ता, सातारा रस्ता, बाह्य़वळण मार्ग, पौड रस्ता, कर्वे रस्ता तसेच स्वारगेट येथील जेधे चौक, शिवाजीनगर येथील वेधशाळा चौक येथील वाहनांची संख्या पाहता या भागातून जाणाऱ्या पादचाऱ्यांना अक्षरश: जीव मुठीत धरून रस्ता ओलांडावा लागतो. विशेषत: रस्ता ओलांडणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांची मोठीच तारांबळ होते. रेल्वे स्थानक, एसटी स्थानकाच्या बाहेरील चौकात हे दृश्य नेहमीच पाहायला मिळते.

शहरातील अनेक महत्त्वाचे रस्ते, पदपथ अतिक्रमणांमुळे व्यापले गेले आहेत. जंगली महाराज रस्ता भागातील पदपथ प्रशस्त करण्यात आला असला तरी त्याचा वापर उपाहारगृहात येणारे ग्राहक त्यांची वाहने लावण्यासाठी करतात. पदपथांवरील जागा फुगे विक्रेते, किरकोळ विक्रेत्यांनी व्यापल्या आहेत. शहरातील अनेक महत्त्वाच्या रस्त्यांवरील पदपथांवर अतिक्रमण झाले आहे. त्यामुळे तेथून चालणे देखील अवघड होत आहे. काही महिन्यांपूर्वी महापालिका आयुक्त, पोलीस आयुक्त यांची संयुक्त बैठक झाली होती. पदपथ तसेच प्रमुख चौकातील अतिक्रमणांवर कारवाई करण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला होता. मात्र, कारवाई थंडावताच पुन्हा अतिक्रमणे झाली.

शहर परिसरात झालेल्या अपघातात गेल्या चार महिन्यात २० पादचारी मृत्युमुखी पडले. दुचाकी अपघातात ३० जणांचा मृत्यू झाला. वेगवेगळ्या अपघातात दुचाकीवरील ८ सहप्रवासी मृत्युमुखी पडले. पादचाऱ्यांच्या सुरक्षेला पोलिसांकडून प्राधान्य देण्यात आले आहे. काही भागात पदपथ नाहीत. तेथे अतिक्रमणे झाली आहेत. अशा भागांची यादी करून महापालिकेला पाठविण्यात आली आहे. पोलीस आणि महापालिका प्रशासनाने तेथील अतिक्रमणे काढून टाकली आहेत. ज्या भागात पदपथ नाहीत, तेथे तातडीने पदपथ करावेत तसेच पदपथांना कठडे बसविण्यात यावेत, अशा सूचना करण्यात आल्या आहेत. प्राणांतिक अपघातांचे (फेटल अ‍ॅक्सिडेंट) प्रमाण कमी करण्यात वाहतूक पोलिसांना यश आले आहे, असे वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त पंकज देशमुख यांनी सांगितले.

संयुक्त प्रयत्न, पण तोकडेच

रस्ते अपघातांची संख्या चिंताजनक असल्याचे निरीक्षण सर्वोच्च न्यायालयाने स्थापन केलेल्या समितीने नोंदविले आहे. या समितीत निवृत्त न्यायमूर्तीचा समावेश आहे. या समितीने राज्य शासनाला अपघात कमी करण्यासाठी उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या आहेत. रस्ते अपघात कमी करण्यासाठी प्रादेशिक परिवहन कार्यालय, वाहतूक पोलीस आणि महापालिका प्रशासनाकडून संयुक्तपणे प्रयत्न करण्यात येत आहेत.  मात्र, संयुक्त  प्रयत्न देखील तोकडेच पडत आहेत. बेदरकारपणे वाहने चालविणाऱ्या वाहन चालकांच्या चुकांमुळे निष्पापांचे बळी जात आहेत.

पादचारी सुरक्षेला प्राधान्य देण्यात येत असून त्यादृष्टीने उपाययोजना सुरू आहेत. ज्या रस्त्यांवर  पादचाऱ्यांसाठी सिग्नल नाहीत, तेथे सिग्नल बसवून ते सुरू करण्यात यावेत, अशी सूचना महापालिका प्रशासनाला देण्यात आली आहे. काही प्रमुख चौकात रस्ते ओलांडण्यासाठी आखण्यात आलेले पट्टे (झेब्रा क्रॉसिंग) पुसट झाले आहेत. ते ठळकपणे आखण्यात यावेत, अशीही सूचना महापालिका प्रशासनाला देण्यात आली आहे. येत्या काही दिवसांत शहराच्या वेगवेगळ्या भागात पादचाऱ्यांसाठी बसवण्यात आलेले सिग्नल कार्यान्वित होतील.

– पंकज देशमुख, पोलीस उपायुक्त, वाहतूक  शाखा