गुजरात, राजस्थानातील उत्पादनात घट; तापमानातील बदलांचा परिणाम

पुणे : स्वयंपाकघरातील प्रत्येक फोडणीत वापरले जाणारे जिरे यंदाच्या हंगामात महागण्याची शक्यता आहे. राजस्थान आणि गुजरात या दोन राज्यांतील जिरे उत्पादनावर हवामानाचा परिणाम झाला आहे.

फेब्रुवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यात या दोन राज्यांत उन्हाचा तडाखा बसल्यामुळे जिरे उत्पादनात घट होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. परिणामी किरकोळ बाजारात येत्या काही दिवसांत जिऱ्याच्या दरात किलोमागे दहा ते पंधरा रुपयांनी वाढ होण्याची शक्यता व्यापाऱ्यांनी व्यक्त केली आहे.

राजस्थान, गुजरातमधील जिऱ्याचा हंगाम सुरू झाला आहे. १५ मार्चनंतर राजस्थानातील जिऱ्याची आवक सुरू होईल. गेल्या वर्षी या दोन राज्यांत जिऱ्याचे उत्पादन वाढले होते. साधारणपणे ९५ लाख पिशव्या एवढे उत्पादन मिळाले होते. एका पिशवीत पन्नास किलो जिरे असतात.

सध्या किरकोळ बाजारात प्रतवारीनुसार एक किलो जिऱ्याची विक्री १६० ते २०० रुपयांनी केली जात आहे. यंदा हवामानातील बदलांमुळे जिरे उत्पादनावर परिणाम झाला आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत जिरे उत्पादनात घट होण्याची शक्यता आहे. यंदा ८० लाख पिशव्या एवढे जिरे उत्पादन होण्याची शक्यता आहे. गेल्या हंगामाच्या तुलनेत यंदा जिरे उत्पादनात १५ लाख पिशव्यांची तूट आहे. सध्या देशभरात जिऱ्याचा साठा शिल्लक असला, तरी नवीन हंगामात होणारी आवक विचारात घेता पुढील महिनाभरात जिऱ्याच्या भावात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे.

तुर्कस्तान, सिरियातील जिरे महाग

तुर्कस्तान आणि सिरियात जिऱ्याचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर केले जाते. मात्र, गेल्या काही वर्षांपासून तेथील जिरे उत्पादन कमी झाले आहे. पूर्वी तेथून भारतात जिऱ्याची आवक व्हायची. मात्र, तेथील जिरे सध्या युरोपात जाते. तुर्कस्तान आणि सिरियातील एक टन जिऱ्यांचा भाव आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत २५०० डॉलर आहे. भारतीय जिऱ्याचा भाव १८०० डॉलर आहे. त्यामुळे परदेशातील जिऱ्यांपेक्षा भारतातील जिरे स्वस्त आहेत.

थोडी माहिती…

  • गुजरात आणि राजस्थान या दोन राज्यांत देशाच्या बहुतांश भागाला पुरेल इतके जिऱ्याचे उत्पादन घेतले जाते.
  • गुजरातमधील सौराष्ट्र विभागातील राजकोट, भावनगर, कच्छ भागांतील शेतकरी जिरे उत्पादन घेतात. राजस्थानात पाकिस्तान सीमेलगतील भागात जिरे उत्पादन घेतले जाते.
  • अहमदाबादपासून शंभर किलोमीटर अंतरावर उंजा बाजारपेठ आहे. तेथून संपूर्ण देशभरात जिरे विक्रीस पाठविले जातात.

कारण काय?

यंदा फेब्रुवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यात राजस्थान आणि गुजरातमधील वातावरणात बदल झाला. उन्हाचा तडाखा वाढल्याने जिरे उत्पादनावर परिणाम झाला आहे, अशी माहिती गुलटेकडी मार्केट यार्डमधील वीरल अ‍ॅग्रोटेकचे संचालक आणि जिरे व्यापारी रमेश पटेल यांनी दिली.

हवामानाचा परिणाम गुजरात आणि राजस्थानातील जिरे उत्पादनावर झाला आहे. गेली दोन वर्षे जिऱ्याचे भाव स्थिर होते. यंदा उत्पादनात घट होण्याची शक्यता असल्याने भावात वाढ होण्याची शक्यता आहे. – रमेश पटेल, जिरे व्यापारी,  मार्केट यार्ड भुसार विभाग