तातडीने वीजबिल भरण्यास प्रोत्साहन देण्यासाठी वीजबिलाच्या तारखेपासून काही दिवसांत वीजबिल भरल्यास बिलामध्ये एक टक्का सूट देण्यात येते. मात्र, वीजबिल निघाल्यापासून संबंधित कालावधीपर्यंत ते ग्राहकापर्यंत पोहोचणे गरजेचे आहे. काही भागांमध्ये नेमके हेच होत नाही. सूट मिळण्याच्या कालावधीत वीजबिल मिळतच नसल्याने अनेक ग्राहकांना या सवलतीपासून वंचित राहावे लागते.
सुरुवातीला विजेचे बिल दोन महिन्यांतून एकदा दिले जात होते. त्यानंतर आता प्रत्येक महिन्याला ग्राहकाला वीजबिल दिले जाते. प्रत्येक महिन्याला फोटोरििडग घेऊन त्याची बिले काढणे व ती ग्राहकांपर्यंत पोहोचविण्यासाठी मोठी यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली आहे. बिलांची ही कामे खासगी ठेकेदारीच्या मार्फत केली जातात. मात्र, बिलामध्ये अनेकदा गडबडीही होत असतात. अगदी काही वेळेला चुकीचे वीजबिलही दिले जाते. या गडबडींमधील एक गडबड म्हणजे वेळेत वीजबिल ग्राहकांपर्यंत पोहोचविले जात नाही. अनेक भागांत याबाबतच्या तक्रारी आहेत.
वीजबिलावर देयक दिनांक असतो. बिल भरण्याची अंतिम तारीख दिलेली असते. त्याचप्रमाणे एक टक्का सूट मिळण्याचा कालावधीही नोंदविलेला असतो. नेमका हाच कालावधी संपत असताना अनेकांना बिले मिळतात. एक टक्का का होईना, पण वेळेत बिल भरून सूट मिळविण्याची इच्छा असणाऱ्या ग्राहकांकडून या प्रकाराबाबत संताप व्यक्त करण्यात येत आहे. ग्राहकांना प्रोत्साहन देण्याच्या दृष्टीने ही योजना असली, तरी त्याचा ग्राहकांनाच फायदा होणार नसेल, तर उपयोग काय, असे प्रश्न उपस्थित केला जात आहे. बिल निघाल्याच्या तारखेपासून ते ग्राहकांना तातडीने मिळाले पाहिजे. त्यासाठी यंत्रणेत सुधारणा करावी, अशी मागणी ग्राहकांकडून करण्यात येत आहे.
 
ई-मेलवरही मिळू शकते वीजबिल

एक टक्का सूट मिळविण्यासाठी वेळेत वीजबिल हवे असेल, तर आपण ई-मेलवरही वीजबिल मिळवू शकतो. याबाबतची व्यवस्था सध्या महावितरण कंपनीच्या http://www.mahadiscom.in या संकेतस्थळावर करण्यात आलेली आहे. संकेतस्थळावर ग्राहकांविषयीच्या रकान्यात वीजबिल ई-मेलवर मिळण्यासाठी आधी नोंदणी करावी लागेल. नोंदणी झाल्यानंतर प्रत्येक महिन्याला बिलाच्या तारखेलाच आपल्या मेलवर वीजबिल मिळेल. बिलाची ऑनलाइन भरणा करण्याची व्यवस्थाही आहे. मात्र, मेलवरील बिलाची प्रिंट काढून त्याद्वारेही वीजबिल भरता येते.