प्रादेशिक परिवहन कार्यालयांतर्गत नागरिकांना देण्यात येणाऱ्या सेवांपैकी दहा सेवांचा समावेश सेवा हमी कायद्यात करून या सेवा देण्याचा कालावधी निश्चित करण्यात आला आहे. मात्र, आरटीओ कार्यालयात सर्वाधिक मागणी असलेल्या वाहन चालविण्याचा परवान्याच्या सेवेचा त्यात समावेश करण्यात आलेला नाही. परवाना मिळविण्यासाठी मोठा कालावधी लागत असल्याने सध्या नागरिकांना एक दिव्यच पार करावे लागत असल्याने या सेवेचा कालावधीही निश्चित करून ठरावीक कालावधीतच नागरिकांना वाहन परवाना मिळण्याची व्यवस्था करावी, अशी मागणी करण्यात येत आहे.
परिवहन आयुक्त कार्यालयाने एक परिपत्रक काढून प्रादेशिक परिवहन कार्यालयातून देण्यात येणाऱ्या दहा वेगवेगळ्या सेवांचा सेवा हमी कायद्यात समावेश केला आहे. या सेवांचा कालावधी निश्चित करण्यात आला आहे. दिलेल्या कालावधीत नागरिकांना संबंधित सेवा न दिल्यास त्यास जबाबदार असणाऱ्या अधिकाऱ्यावर दंडात्मक कारवाई करण्याची तरतूदही त्यात करण्यात आली आहे. त्यामुळे ठरविलेल्या कालावधीतच नागरिकांना सेवा दिली गेली पाहिजे, असा स्पष्ट आदेश काढण्यात आला आहे. २५ जानेवारीपासून त्याची अंमलबजावणीही सुरू करण्यात आली आहे. या सेवांसाठी नागरिकांना ऑनलाइन पद्धतीने अर्ज सादर करावे लागणार आहे.
सेवा हमी कायद्यात घेतलेल्या दहा सेवांमध्ये वाहन परवान्याचे नूतनीकरण, दुबार वाहन परवाना, वाहन नोंदणी प्रमाणपत्र आदी काही सेवा वगळल्यास इतर सर्व सेवा वाहतूकदारांशी संबंधित आहेत. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना त्याचा फारसा लाभ होणार नाही. वाहन चालविण्याचा शिकाऊ व पक्का परवाना मिळविण्यासाठी कालावधीची निश्चिती करण्याची गरज असल्याचे मत सध्या व्यक्त करण्यात येत आहे. वाहन परवाना मिळविण्यासाठी नागरिकांना ऑनलाइन अर्ज सादर करावे लागतात व ऑनलाइन पद्धतीनेच परवान्यासाठी चाचणीची वेळ घ्यावी लागते. पुण्यात वाहन परवाना मागणाऱ्यांची संख्या लक्षात घेता सध्याची यंत्रणा कुचकामी ठरत असल्याचे अनेकदा स्पष्ट झाले आहे.
शिकाऊ परवाना काढण्यासाठी अर्ज केल्यास परीक्षेसाठी दोन ते तीन महिने वाट पाहावी लागते. शिकाऊ परवाना मिळाल्यानंतर सहा महिन्यांचा आत पक्का परवाना काढावा लागतो. मात्र, पक्क्य़ा परवान्यासाठी नागरिकांना मोठय़ा परीक्षेतून पुढे जावे लागते. वाहन चाचणी घेण्यासाठी कधीकधी चार ते पाच महिने तारीखच मिळू शकत नाही. अनेकदा शिकाऊ परवान्याचीही मुदत संपते. त्यामुळे नागरिकांना वेगळाच भरुदड सहन करावा लागतो. या परिस्थितीत सेवा हमी कायद्यांर्तगत सेवेचा कालावधी निश्चित करण्याची खरी गरज वाहन चालविण्याच्या परवान्याच्या बाबतीत आहे. त्यामुळे या सेवेचा सेवा हमी कायद्यात समावेश करावा, अशी मागणी सध्या करण्यात येत आहे.