विद्यापीठाप्रमाणेच महाविद्यालयांमध्येही कमवा आणि शिका योजनेमध्ये काम करणाऱ्या विद्यार्थ्यांचे मानधन वाढवून प्रतितास २५ रुपये करण्यात यावे, अशी मागणी अधिसभेचे सदस्य संतोष ढोरे यांनी केली आहे.
विद्यापीठ आणि संलग्न महाविद्यालयांमध्ये मिळून साधारण २८ हजार विद्यार्थी कमाव आणि शिका योजनेमध्ये काम करतात. त्यापैकी साधारण सातशे विद्यार्थी विद्यापीठाच्या आवारामध्ये काम करतात. विद्यापीठामध्ये काम करणाऱ्या विद्यार्थ्यांचे मानधन वाढवून प्रतितास २५ रुपये करण्यात आले आहे. मात्र, महाविद्यालयांमध्ये काम करणाऱ्या विद्यार्थ्यांचे मानधन मात्र प्रतितास २० रूपयेच आहे. महाविद्यालयामध्ये काम करणाऱ्या विद्यार्थ्यांचे मानधन या शैक्षणिक वर्षांपासून वाढवून प्रतितास २५ रुपये करण्यात यावे, अशी मागणी ढोरे यांनी केली आहे. याबाबत पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. वासुदेव गाडे यांना निवेदन देण्यात आले आहे, अशी माहिती ढोरे यांनी दिली.