‘मी खूप बिडी प्यायचो..एक दिवस रस्त्यावर बडबड करताना सापडलो आणि मनोरुग्णालयात आलो..पण आता मी व्यसन नाही करत. मला नोकरी करायचीय..घरी परत जायचंय..’ संदीप नायर (नाव बदलले आहे) सांगत होते. २०१३ पासून येरवडा प्रादेशिक मनोरुग्णालयात भरती झालेल्या व आता प्रकृती बरी असलेल्या नायर यांना बाहेर नोकरी मिळाली आहे. विशेष म्हणजे सर्व गोष्टींची घडी बसेपर्यंत ते मनोरुग्णालयात राहूनच ही नोकरी करणार आहेत.
टाटा ट्रस्टच्या ‘इन्सेन्स’ (इंटिग्रेटेड कम्युनिटी केअर रीलेटेड टू नीड्स ऑफ पीपल विथ सिव्हिअर मेंटल डिसॉर्डर्स) या प्रकल्पाअंतर्गत परिवर्तन संस्थेतर्फे मनोरुग्णालयात चालवल्या जाणाऱ्या ‘देवराई’ कक्षाला एक वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त संस्थेतर्फे विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी मानसिक आजारातून बऱ्या झालेल्या रुग्णांनी ज्येष्ठ नाटय़ दिग्दर्शक अतुल पेठे यांच्या मार्गदर्शनाखाली ‘मानसरंग’ या कार्यक्रमाचे सादरीकरण केले.
या वेळी ‘लोकसत्ता’ने नायर यांच्याशी संवाद साधला. नायर म्हणाले,‘‘मला आकुर्डीत ‘हाऊसकीपिंग सुपरवायझर’ची नोकरी मिळाली आहे. गेल्या आठवडय़ात माझी मुलाखत घेतली गेली आणि सर्व प्रश्नांची उत्तरे मला चांगली देता आली. आता पुढच्या आठवडय़ापासून काम सुरू करता येईल. माझ्या घरी बहीण आणि तिची मुलगी असते. इथून बाहेर पडल्यावर मला घरी जायचे आहे.’’
मनोरुग्णालय अधीक्षक डॉ. भालचंद्र डोंगळकर म्हणाले,‘‘देवराई कक्षात राहणारे रुग्ण न्यायालयाच्या आदेशानुसार मनोरुग्णालयात दाखल करुन घेतले गेलेले व दीर्घकाळ येथे राहून मानसिक आजारातून बरे झालेले आहेत. यातील रुग्णांना केवळ किरकोळ औषधे सुरू आहेत. त्यांच्यापैकी काहींच्या नातेवाइकांचा पत्ता नाही, तर काहींना त्यांचे नातेवाईक घरी नेण्यास तयार नाहीत. मनोरुग्णालयाच्या ‘व्हिजिटर्स कमिटी’ने या रुग्णाला मनोरुग्णालयात राहून बाहेर जाऊन काम करण्याची परवानगी दिली आहे. रुग्णाची बाहेरील वर्तणूक, नोकरीतील काम चांगले राहिले आणि त्याने स्वत: बाहेर पडण्याची इच्छा प्रदर्शित केली, तर त्याला ‘लीव्ह ऑफ अबसेन्स’च्या नियमाअंतर्गत कायमचे देखील बाहेर सोडता येते.’’
सध्या मनोरुग्णालयात दोन वर्षांपेक्षा अधिक काळ राहणारे व काही कारणाने घरी न जाऊ शकणारे ६०० रुग्ण असल्याची माहिती ‘परिवर्तन’चे डॉ. हमीद दाभोलकर यांनी दिली. ते म्हणाले,‘‘गेल्या वर्षभरात ‘देवराई’मध्ये ३० मनोरुग्ण आले. त्यातील ८ जणांचे त्यांच्या कुटुंबात पुनर्वसन झाले असून सहा जणांना त्यांच्या कुटुंबातील लोक भेटू लागले. मानसिक आजारातून बऱ्या झालेल्या व्यक्तीला रुग्णालयातील कक्षात राहून बाहेर नोकरी करण्याची संधी मिळणे हा मोठा सकारात्मक बदल ठरु शकेल.’’