उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालक मंत्री अजित पवार, माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत पिंपरी येथे कोविड सेंटरचं उद्घाटन करण्यात आलं. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपल्या अनोख्या शैलीत फटकेबाजी केली. फडणवीस आणि मी एकत्र येणार असं म्हटलं की लगेच ब्रेकिंग न्यूज होते असं म्हणत अजित पवार यांनी टोला लगावला.

“आज देवेंद्र फडणवीस आणि मी या कार्यक्रमाला एकत्र आलो आहोत. आम्ही नुसतं कार्यक्रमाला एकत्र येणार असं समजल्यावर कालपासूनच ब्रेकिंग न्यूज सुरू झाली. कदाचित चंद्रकांत पाटीलही या ठिकाणी येणार आहेत याची कदाचित त्यांना कल्पना नव्हती म्हणून त्यांचं नाव आलं नाही. नाहीतर त्यांचंही नाव सोबत आलं असतं,” असं पवार म्हणाले. “राजकीय भूमिका, राजकीय मतं वेगवेगळी असू शकतात. निवडणुका झाल्यानंतर सत्ताधारी आणि विरोधीपक्षाचा असा भेदभाव, आरोपप्रत्यारोप न करता संकटाच्या काळात एकत्र काम करण्याची महाराष्ट्राची परंपरा आहे. त्या परंपरेला साजेसंच वागलं पाहिजे. सत्ताधारी आणि विरोधक मिळून एकत्र या संकटाचा सामना केला पाहिजे,” असंही त्यांनी नमूद केलं.

आणखी वाचा- पुणेकरांना अजित पवारांनी दिला इशारा, “मास्क घातलं नाही तर…”

मास्क न वापरल्यास दंड

“आजही महाराष्ट्रात काही ठिकाणी नागरिक मास्क वापरत नाहीत. पुणे जिल्हा, पुणे शहर आणि पिंपरी-चिंचवड शहरात मास्क वापरलं नाही तर १ हजार रुपये दंड आकारण्याचा विचार आहे. त्याशिवाय नागरिकांमध्ये जागरूकता निर्माण होत नाही. सर्वांनी मास्क वापरलाच पाहिजे. फिजिकल डिस्टसिंग ठेवलेच पाहिजे. हे सर्व नियम नागरिकांनी कटाक्षाने पाळले पाहिजेत,” असे आवाहन अजित पवार यांनी नागरिकांना केले आहेत.