राष्ट्रवादीने मागितलेल्या माहितीला काँग्रेसचा विरोध

आगामी निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर विकासकामांसाठी वर्गीकरणाद्वारे निधी पळविण्याचा प्रकार महापालिकेत सुरू झालेला असतानाच आता ‘अखर्चित’ रकमेचीही या पळवापळवीत भर पडणार आहे. कोणत्या नगरसेवकाच्या निधीतीली किती रक्कम अखर्चित राहिली आहे, यासंबंधीची माहिती सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसचे सभागृहनेता शंकर केमसे यांनी प्रशासनाकडून मागविली आहे. अखर्चित रकमेची माहिती मागण्याच्या मुद्याववरून आता राष्ट्रवादी काँग्रेस-काँग्रेसमध्ये वाद सुरू झाला आहे.

राष्ट्रवादीने त्यांच्या नगरसेवकांच्या अखर्चित निधीसंबंधीची माहिती मागवावी. मात्र सर्व नगरसेवकांच्या निधीची माहिती मागविण्याचा ‘हेतू’ काय आहे, अशी थेट विचारणा विरोधी पक्षनेता आणि काँग्रेसचे गटनेता अरविंद शिंदे यांनी केली आहे. त्यामुळे खर्चित रकमेवरून राष्ट्रवादी काँग्रेस-काँग्रेसमध्ये वाद होण्याची शक्यता आहे.

महापालिकेच्या अंदाजपत्रकामध्ये विविध विकासकामे करण्यासाठी आर्थिक तरतूद करण्यात येते. मात्र काही अडचणींमुळे ही कामे पूर्ण होऊ शकत नाहीत. त्यामुळे त्या कामांसाठी तरतूद केलेली रक्कम अखर्चित राहते. बहुतांश वेळा या अखर्चित रकमेचे वर्गीकरणही इतर कामांना निधी उपलब्ध व्हावा म्हणून करण्यात येते. त्यानुसार चालू आर्थिक वर्षांत कोणती विकासकामे पूर्ण होऊ शकणार नाहीत, याची माहिती सभागृह नेते शंकर केमसे यांनी महापालिका आयुक्त कुणाल कुमार यांच्याकडे मागविली आहे. ही माहिती संकलित करून त्याची माहिती देण्याची मागणीही त्यांनी केली आहे. त्यानुसार आयुक्त कुणाल कुमार यांनी खातेप्रमुख आणि क्षेत्रीय कार्यालयांकडे त्याबाबतची विचारणा केली असून माहिती संकलित करण्याच्या सूचना दिल्या आहेत. केमसे यांच्या माहिती घेण्याला अरविंद शिंदे यांनी विरोध केला आहे. नगरसेवकांच्या प्रभागातील कामांची माहिती गोळा करण्यामागे नेमका कोणता हेतू आहे. ही माहिती राष्ट्रवादीला का दिली जात आहे, अशी विचारणा शिंदे यांनी केली. आमच्या कामाच्या पैशांवर त्यांचा डोळा आहे का, असा प्रश्नही काँग्रेसने उपस्थित केला आहे.