आनंद सराफ

पी १० शहरातलं गाव फा.भावे 

पुण्याच्या पूर्व दिशेला बंडगार्डन, येरवडय़ाच्या पुढे नगर रस्ता सुरू होतो. तीस-चाळीस वर्षांपूर्वी हा रस्ता एकपदरी होता. स्वातंत्र्यपूर्वकाळातील हा काँक्रीटचा मार्ग. जुना काँक्रीटचा रस्तादेखील अनेक ठिकाणी भेगाळलेला, ट्रक आणि एस.टी.ची वाहतूक, टांग्यांची, बैलगाडय़ांची चलती, मोजक्याच उद्योग धंद्यांच्या क्षीण झालेल्या चिमण्या अगदी १९६० च्या आसपास असेच काहीसे चित्र हे पुण्याजवळच्या नगर रस्त्याच्या भागातील बहुतेक गावांचे होते. वडगावशेरी हे गाव याच वाटेवरचे विकास सामावून घेत गावपण जपणारे!

वडगावशेरीची ठळक वैशिष्टय़े जाणून घेताना आता लष्करी आस्थापने, आय.टी. कंपन्या, बहुभाषक वस्त्या, ख्रिस्ती मिशनरीच्या शिक्षण समाजसेवी संस्था, लघुउद्योग, इंग्रजी माध्यमांच्या शाळा, महाविद्यालये, परंपरा आणि आधुनिकतेचा मिलाफ, सर्वपक्षीय सामंजस्य, धार्मिकतेची जपणूक, मुबलक पाणी आणि तुलनात्मक स्वस्त जमिनी असे खूप काही अनुभवास येते. नगर रस्त्याच्या बाजूला पुणे वाढले आहे. ते आता थेट वाघोलीपर्यंत विस्तारले आहे. हे गाव आधुनिक विकासाचा नवा चेहरा घेऊन सज्ज होत आहे.

नगर रस्त्याने आगाखान पॅलेसच्या पुढेच रामवाडी फाटा लागतो. या रस्त्याने थेट वडगावशेरी गावठाणात आपण प्रवेश करतो. हम रस्त्याने गावाकडे येताना वाटेतच संभाजी चौक वा सनसिटी चौक लागतो. या चौकात सर्वत्र टोलेजंग इमारती आणि त्यांची काचेची तावदाने पाहिल्यास हिंजवडी, बालेवाडी परिसराचाच भास होतो. गावाची वस्ती आता एक लाखाच्या पुढे पोचली आहे. पूर्वेस- खराडी, दक्षिणेस- मुळा मुठा, उत्तरेस- लोहगाव आणि पश्चिमेस- येरवडा अशा या गावाच्या चतु:सीमा सांगता येतील. वडगावशेरी मूळ गावठाणामध्ये आजही पेशवाईच्या उत्तरार्धात उभारलेली काही मोजकी घरे तग धरून असल्याचे लक्षात येते. गावठाणात मुख्यत्वे खालची, वरची आणि मधली अशा तीन गल्ल्या असून, अशोकनगर ही बौद्ध वस्ती, तसेच चर्मकार समाजाची पण काही घरे आहेत. १९७५ पूर्वी गावाची वस्ती जेमतेम पाच-सहाशे उंबरा एवढीच होती. त्या काळी जमिनीला भाव जेमतेम पाचशे रुपये गुंठा एवढाच होता. आता हेच भाव तीस लाखापर्यंत पोहोचल्याचे जुन्या जाणत्या मंडळींनी सांगितले.

काळ बदलला, पिढय़ा बदलल्या तरी गावातील श्रद्धास्थाने ही जुनी-नवी मंदिरे राहतात. भैरवनाथ, महादेव, मारुती, गणपती, वेताळबाबा, शितळादेवी, काळूबाई, मारुती, रामवाडीचे राममंदिर, स्वामी समर्थ मंदिर, सावता महाराज अशी इतर देवस्थाने नव्या वस्त्यांमध्ये उभारली आहेत. माघ कालाष्टमी गावाचा उरुस असतो. प्रथेप्रमाणे छबीना, तमाशे आणि ढोल-ताशांचे खेळ होत असत. पूर्वी चाळीस-पन्नास खेळांची संख्या आता पाच-सातवर आल्याचे समजले. चिंतामण वळतीकर, जगताप पाटील पिंपळेकर, सरस्वतीबाई कोल्हापूरकर यांचे तमाशा गावकऱ्यांमध्ये विशेष लोकप्रिय होते. कुस्त्यांचे रंगणारे फड ही गावाची खासियत होती. आता कुस्तीच्या इनामाचा आकडा पाच लाखांवर गेल्याचे समजले.  गोकुळ अष्टमी, भजन स्पर्धा, काकड आरत्यांचे जागर हे वैशिष्टय़ गावाने आजतागायत जपले आहे. काकड आरतीसाठी नामवंत न्यायमूर्ती यशवंतराव चंद्रचूड आणि अशाच अनेकांनी आवर्जून हजेरी लावल्याची माहिती मिळाली.

गावातील मूळचे रहिवासी, शेतकरी, जमीनदार यांच्या घराण्यांचा वेध घेता गलांडे, चांधेरे, खराडकर, मुळीक, पाडाळे, देवकर, शिंदे ही नावे समजली. गावाच्या विकासासाठी योगदान असलेल्या ज्येष्ठ मंडळींपैकी भिकोबा गलांडे, ज्ञानेश्वर मुळीक, लालाराम चांधेरे, निवृत्ती अप्पा गलांडे, विष्णू शिंदे, बाळासाहेब पाडाळे, प्रकाश काळे, अशोक घुले, सोपान गलांडे यांचा उल्लेख महत्त्वाचा आहे. तसेच खराडकर मंडळी हे मूळचे साताऱ्याच्या शाहू महाराजांचे राजज्योतिषी, भंडारे, पुढे कुलकर्णी आणि आता खराडकर अशी त्यांची नावे इनाम आणि जबाबदारीनुसार बदलत गेली. रावजी खराडकर हे मुंढवा, खराडी आणि वडगावशेरी या तिन्ही गावात मंदिरातील पूजा-अर्चा, भिक्षुकी आणि शेती हे सर्व काही घोडय़ावरून फेरफटका मारून करायचे, असे समजले. गावाचा इतिहास जाणून घेताना निजामशाही, आदिलशाही, शिवकाळातील सुपे परगणा ही सर्व पाने चाळावी लागतात.

सर्वपक्षीय नेतृत्व आणि कार्यकर्त्यांमुळे राजकीय क्षेत्रातही वडगावशेरीचा गवगवा आहे. यशवंतराव चव्हाण, बाळासाहेब ठाकरे, अब्दुल कलाम यांच्या सभा, भेटी या गावाने पाहिल्या आहेत. मिशनरी संस्थांबरोबरच दिशा फाउंडेशन, जैन संघटना, रा.स्व. संघ, स्वामी समर्थ ट्रस्ट, संतुलन पाषाण शाळा, बेहरे वृद्धाश्रम, स्थानिक उत्सव मंडळे यांचे योगदान महत्त्वाचे आहे.

गावाचा विकासाभिमुख चेहरा जाणून घेताना नव्या पिढीच्या कार्यकर्त्यांची ओळख आवश्यक आहे. मुकुंद गलांडे, संजय चांधेरे, नारायण गलांडे, विशाल सातव, राजाभाऊ पाडळे, अशोक राऊत, शिवाजी चांधेरे यांचा गावामध्ये लौकिक जाणून घेतला. शहराचा विकास आराखडा तयार होताना दूरदर्शीपणाने घेतलेले निर्णय इथे प्रत्ययास येतात. परंपरा आणि आधुनिकतेचा मेळ घालताना विकासाच्या गाडीची सुरळीत धाव महत्त्वाची ठरते. या लेखनासाठी आपुलकीने साहाय्य करणारे काळूराम चांधेरे, माजी नगरसेवक सचिन भगत, अ‍ॅड. अनिल खराडकर तसेच ऐतिहासिक संदर्भासाठी डॉ. अविनाश सोवनी यांचे मार्गदर्शन उपयुक्त ठरले.