News Flash

“मेधा कुलकर्णींना विचारा चंद्रकांत पाटलांनी पुण्यात येऊन काय प्रश्न निर्माण केले?”

राष्ट्रवादीच्या जयंत पाटील यांनी साधला निशाणा

चंद्रकांत पाटील, मेधा कुलकर्णी

पुणे प्रतिनिधी

“पुण्यातील कोथरूड विधानसभा मतदार संघातील भाजपच्या माजी आमदार मेधा कुलकर्णी यांना विधानसभा निवडणुकीत तिकीट नाकारले गेले. त्यांच्या जागी प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील निवडणूक लढवून विजयी झाले. मेधा कुलकर्णी यांना पक्षाकडून योग्य सन्मान दिला जाईल असं सांगितले गेलं होतं. पण आता पदवीधर निवडणुकीतदेखील त्यांना तिकीट नाकारलं. याबद्दल मेधा कुलकर्णी यांनी नाराजी व्यक्त केली होती. चंद्रकांत पाटील जिथे जातात तिथे प्रश्न निर्माण करतात. त्यामुळे चंद्रकांतदादांनी पुण्यात येऊन काय प्रश्न निर्माण केले? हे मेधाताई अधिक चांगल्या प्रकारे सांगू शकतील”, अशा शब्दांत राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यावर निशाणा साधला.

“आपल्या पुणेकरांचं मन खूप मोठं आहे. आपण ते इथे आल्यावर त्यांना स्विकारलं. पण ज्या पुणे शहराच्या आणि पदवीधरच्या विकासासाठी ज्या भागातून ते निवडून आले आहेत, त्यांच्या ते किती उपयोगी पडले आहेत, याचा अभ्यास केल्यास त्याचे उत्तर निश्चित नकारात्मक मिळेल. देशात मागील काही वर्षात पदवीधर मतदारांचे प्रश्न मोठ्या प्रमाणावर प्रलंबित आहेत. ते सर्व प्रश्न सोडविण्यासाठी चंद्रकांत पाटील किती आग्रही दिसून आले? हादेखील एक प्रश्नच आहे. त्यामुळे येत्या काळात आपल्याला हे प्रश्न सोडविण्यासाठी महाविकास आघाडीच्या उमेदवाराला निवडून द्यायला हवं”, असं आवाहन त्यांनी केलं.

दरम्यान, “देवेंद्र फडणवीस यांना राष्ट्रवादीने कधीही टरबुज्या म्हटलेले नाही. पण चंद्रकांतदादांच्या नावाचा शॉर्टफॉर्म ‘चंपा’ असा होतो. त्यामुळे त्यांनी या गोष्टीचा राग मानून घेऊ नये”, असं जयंत पाटील यांनी चंद्रकांत पाटील यांच्या आरोपांना उत्तर दिलं. “शरद पवारांबद्दल मला चुकीचे बोलायचे नव्हते. मी कायदेशीर तरतुदीं संदर्भाने बोलत होतो. पण राष्ट्रवादीचे नेते देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा यांच्यावर टीका करतात. देवेंद्र फडणवीस यांना टरबुज्या म्हणतात, तर मला ‘चंपा’ म्हणतात. हे कसं काय चालतं?”; अशा शब्दात चंद्रकांत पाटील यांनी टीकाकारांना प्रतिप्रश्न केला होता. त्यावर जयंत पाटील यांनी उत्तर दिलं.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 23, 2020 5:52 pm

Web Title: devendra fadnavis chandrakant patil medha kulkarni pune jayant patil bjp ncp verbal fight elections svk 88 vjb 91
Next Stories
1 आठ-दहा दिवसानंतर परिस्थिती पाहून टाळेबंदीबाबत निर्णय!
2 थंडीची प्रतीक्षाच..
3 आयुर्वेदिक डॉक्टरांना शस्त्रक्रिया परवानगी
Just Now!
X