इशाऱ्यानंतरही ठोस उपाययोजना नाही

पुणे : स्मार्ट सिटी अशी ओळख असलेल्या शहरातील आपत्ती व्यवस्थापन विभाग कागदावरच सक्षम असल्याचे पुढे आले आहे. अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर ठोस उपाययोजना राबविण्यात हा विभाग कु चकामी ठरत असल्यामुळे चोवीस तास कार्यरत असलेला हा विभाग नक्की काय करतो, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

भारतीय हवामान विभागाने विजेच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता वर्तविली होती. त्याबाबतचा लेखी इशारा महापालिके लाही देण्यात आला होता. या इशाऱ्यानंतर आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून ठोस उपाययोजना राबविण्यात आल्याचा दावा करण्यात आला होता. मात्र बुधवारी दिवसभर झालेल्या पावसाने हा दावा फोल ठरविला. या दरम्यान, गेल्या तीन वर्षांत या विभागाच्या कामाचा आढावा घेतला असता ठोस उपाययोजना होत नसल्याचे स्पष्ट होत आहे. त्यामुळे पावसामुळे या विभागाच्या कार्यपद्धतीवर टीका सुरू झाली आहे.

मुसळधार पावसाचा अंदाज असताना या विभागाने क्षेत्रीय कार्यालयांना यंत्रणा सुसज्ज ठेवण्याचे आदेश देणे अपेक्षित होते. मोठय़ा पावसात वृक्ष कोसळून जीवित हानी होणे, रस्ते बंद होणे, फांद्या विद्युत यंत्रणांवर पडून वीज पुरवठा खंडित होणे अशा बाबींवरील आराखडा कागदावरच राहिल्याचे दिसून येत आहे. दरवर्षी पावसाचे पाणी सोसायटय़ांच्या आवारात शिरल्यानंतर त्याचा विस्तृत अहवाल के ला जातो. गेल्या वर्षी हीच कार्यपद्धती अवलंबण्यात आली. मात्र पुन्हा त्याच भागात पाणी साचले, ही वस्तुस्थिती आहे. कामे करण्यात आल्याचा दावा करतानाच नाले ओसंडून वाहू लागले. त्यामुळे आपत्ती व्यवस्थापन विभागाने नक्की कोणती कामे के ली, हा प्रश्न पुढे येण्यास सुरुवात झाली आहे.

दरम्यान, सात हजार कोटींचे अंदाजपत्रक महापालिका करते. पुणेकरही कोटय़वधी रुपये कररूपाने तिजोरीत जमा करतात, मात्र अतिवृष्टीमध्ये सर्व यंत्रणा कोलमडून पडते, अशी टीका विरोधी पक्षनेत्या दीपाली धुमाळ यांनी के ली. आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून गेल्या तीन वर्षांतील कामांचा अहवाल मुख्य सभेपुढे ठेवावा, अशी मागणीही त्यांनी के ली.