मद्यपान करून वाहन चालवताना पोलिसांनी पकडले, तर ‘मी मद्यपान केलेले नव्हतेच’ असे वाहनचालक सांगायचे, पण आता असे कोणतेही कारण देऊन स्वत:ची सुटका करून घेता येणार नाही.. कारण वाहतूक शाखेने अत्याधुनिक अशी ३५ ब्रेझ अ‍ॅनालायझर खरेदी केली असून त्यामध्ये मद्यपान केलेल्या व्यक्तीचे छायाचित्र, जीपीआरएसने ते ठिकाण अशी सर्व माहिती मिळणार आहे. ही सर्व माहिती मद्यपान केलेल्या व्यक्तीविरुद्ध महत्त्वाचा पुरावा ठरणार आहे.
जिल्हाधिकारी कार्यालयाकडील जिल्हा नियोजन समिती यांच्या नावीन्यपूर्ण योजनेमधून वाहतूक शाखेला दोन कोटी रुपयांचा निधी मिळाला आहे. या निधीतून वाहतूक शाखेने ३५ ब्रेथ अ‍ॅनालायझर यंत्र खरेदी केली आहेत. या यंत्रणा डीपीआरएस सिस्टीम असून मद्यपान केल्याची तपासणी केल्यानंतर माहितीसह त्या व्यक्तीचा फोटो सुद्धा यामुळे निघणार आहे. पुणे, पिंपरी-चिंचवड परिसरातील अपघाताचे प्रमाण कमी करण्यासाठी आणि वाहतूक सुरळीत आणि सुरक्षित चालण्याकरिता वाहतूक शाखेच्या प्रत्येक विभागाकडून आता मद्यपी वाहन चालकांवर कारवाई केली जाणार आहे. या यंत्राची माहिती व्हावी म्हणून गेल्या दोन दिवसांपासून तज्ज्ञामार्फत ब्रेथ अ‍ॅनालायझर यंत्र चालविण्याचे प्रशिक्षण देण्यात येत आहे. त्याच बरोबर लवकरच मद्यपान करून वाहन चालविणाऱ्याविरुद्ध विशेष मोहीम राबवली जाणार आहे, असे वाहतूक शाखेकडून सांगण्यात आले.
याबाबत वाहतूक शाखेच्या प्रशासन विभागाचे पोलीस निरीक्षक रामचंद्र ढगे यांनी सांगितले, की वाहतूक शाखेकडे ४२ जुनी ब्रेथ अ‍ॅनालायझर आहेत. मात्र, नवीन घेतलेली ३५ ब्रेझ अ‍ॅनालायझर ही अत्याधुनिक असून त्यामध्ये मद्यपान केलेल्या व्यक्तीचे छायाचित्र निघणार आहे. त्याचबरोबर कारवाई केलेल्या ठिकाणाचे जीपीएसद्वारे लोकेशन सुद्धा त्यात नमूद केलेले असेल. जुन्या यंत्रामध्ये एखाद्या व्यक्तीने फुंकर व्यवस्थित न केल्यामुळे कळत नव्हते. मात्र, या यंत्रामध्ये ती व्यक्ती किती गतीने हवा फुंकत आहे हे सुद्धा हे यंत्र सांगणार आहे. त्यामुळे कारवाई केलेली व्यक्ती मी मद्यपान केलेच नव्हते, तो मी नव्हतो अशी कारणे सांगू शकणार नाही. न्यायालयात पुरावा म्हणून या यंत्रातून मिळणारी माहिती महत्त्वाची ठरणार आहे. संबंधित कंपनीचे अधिकारी गेल्या दोन दिवसांपासून वाहतूक शाखेच्या पोलिसांना प्रशिक्षण देत आहेत.