‘ई-मूल्यांकन’ प्रणाली कार्यरत
पुणे : राज्याच्या नोंदणी आणि मुद्रांक शुल्क विभागाने ‘ई-मूल्यांकन’ प्रणाली कार्यरत केली आहे. त्याद्वारे कोणत्याही मिळकतीचे बाजारमूल्य घरबसल्या एका क्लिकवर नागरिकांना समजू शकणार आहे. ही प्रणाली मुंबई महापालिकेच्या कार्यक्षेत्रात वापरण्यात येत असून १ जानेवारीपासून राज्यभर लागू करण्यात आली आहे.
मुंबई महापालिकेच्या कार्यक्षेत्रात २०१८-१९ मध्ये ई-मूल्यांकन प्रणाली उपलब्ध करून देण्यात आली होती. १ जानेवारीपासून ही सुविधा नागरिकांना देण्यात आली आहे. परिणामी नागरिकांना घरबसल्या कोणत्याही मिळकतीचे बाजारमूल्य समजू शकणार आहे, अशी माहिती विभागाकडून देण्यात आली. ही प्रणाली नोंदणी महानिरीक्षक, नगररचना विभागाचे सहसंचालक यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्र (एनआयसी) यांनी विकसित केली आहे. ही प्रणाली http://www.igrmaharashtra.gov.in या संकेतस्थळावर ‘ऑनलाइन सव्र्हिसेस’ या पर्यायामध्ये ई-मूल्यांकन या ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आली आहे.
सध्या कोणत्याही मिळकतीचे बाजारमूल्य समजण्यासाठी नागरिकांना दुय्यम निबंधक कार्यालयातून माहिती घ्यावी लागते. मुद्रांक शुल्क आकारणीसाठी वार्षिक बाजारमूल्यतक्ता (रेडिरेकनर) आणि सविस्तर मूल्यांकनासाठी मार्गदर्शक सूचना या नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाकडून दरवर्षी जाहीर केल्या जातात.
ही माहिती तांत्रिक स्वरूपाची असल्याने सामान्य नागरिकांना दुय्यम निबंधक कार्यालय किंवा अन्य नोंदणी कार्यालयांकडून ही माहिती घ्यावी लागत होती. आता ई-मूल्यांकन प्रणालीमुळे नागरिकांना नोंदणी कार्यालयात न जाता या विभागाच्या संकेतस्थळावरून घरबसल्या मिळकतीचे बाजारमूल्य जाणून घेता येणार आहे.
या प्रणालीमध्ये मिळकतीची माहिती भरल्यानंतर त्या माहितीच्या आधारे अचूक मूल्य ठरवले जाणार असल्याने मूल्यांकनाच्या प्रक्रियेमध्ये पारदर्शकता येणार आहे.