News Flash

भीमथडी घोडय़ांच्या जतनासाठी प्रयत्न -पवार

मराठय़ांच्या सैन्यात मोलाची कामगिरी बजावलेल्या भीमथडी घोडय़ांची प्रजाती नष्ट होण्याच्या मार्गावर आहे.

इंडिजिनस हॉर्स ओनर्स असोसिएशनतर्फे रेस कोर्स येथे आयोजित पाचव्या मारवाडी हॉर्स शोचे शनिवारी उद्घाटन झाले. भारतभरातून शंभराहून अधिक घोडे सहभागी झालेला हा शो रविवारी (१ मार्च) सर्वासाठी खुला असेल.

मराठय़ांच्या सैन्यात मोलाची कामगिरी बजावलेल्या भीमथडी घोडय़ांची प्रजाती नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. ही प्रजाती जतन करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करू, अशी ग्वाही इंडिजिनस हॉर्स ओनर्स असोसिएशनचे संस्थापक सदस्य रणजित पवार यांनी शनिवारी दिली.

असोसिएशनतर्फे रेस कोर्स येथे आयोजित पाचव्या मारवाडी हॉर्स शोचे उद्घाटन पवार यांच्या हस्ते झाले. त्या वेळी ते बोलत होते. असोसिएशनचे अध्यक्ष अजय नेन्सी, कार्यकारिणी सदस्य हर्ष लुनिया, रणजित नगरकर, केशव जोशी, आशिष बोरावके, विकास बोयतकर, राहुल बोराडे, हर्निश पटेल, जयेश पेखळे, हर्षवर्धन तावरे या वेळी उपस्थित होते. हा हॉर्स शो रविवारी (१ मार्च) सर्वासाठी विनामूल्य खुला आहे.

पवार म्हणाले, मराठय़ांच्या सैन्यातील घोडदळामध्ये मोठय़ा प्रमाणावर भीमथडी घोडय़ांचा समावेश असे. ही प्रजाती काळाच्या ओघात नामशेष होण्याची भीती आहे. देशाच्या आणि राज्याच्या दृष्टीने ऐतिहासिक महत्त्व असलेल्या या प्रजातीचे संवर्धन करण्यासाठी आम्ही असोसिएशनच्या माध्यमातून सर्वतोपरी प्रयत्न करू. पुढील वर्षीच्या मारवाडी हॉर्स शोमध्ये एक विभाग भीमथडी घोडय़ांचा असेल या दृष्टीने पावले उचलू.

महाराष्ट्रातील ऐतिहासिक स्थळांशी संबंधित पर्यटनाला चालना देण्यासाठी राज्य सरकारने पावले उचलली तर भारतीय प्रजातीच्या घोडय़ांचा मोठा वापर होऊन रोजगारासाठीचे नवीन पर्याय उपलब्ध होऊ  शकतील, असेही पवार यांनी सांगितले.

पाचव्या मारवाडी हॉर्स शोमध्ये भारतभरातून शंभरहून अधिक घोडे सहभागी झाले आहेत. यामध्ये सहा विभागांमध्ये सुमारे १३ लाखांची बक्षिसे देण्यात येणार आहेत. भारतीय प्रजातीच्या घोडय़ांचे संरक्षण आणि संवर्धन करण्याच्या हेतूने स्थापन झालेल्या इंडिजिनस हॉर्स ओनर्स असोसिएशनने मारवाडी घोडय़ांच्या प्रजातीच्या संवर्धनासाठी उल्लेखनीय कामगिरी केली आहे. सध्या महाराष्ट्रात ९० हून अधिक अश्वपालक या प्रजातीच्या संवर्धनात मोलाचे योगदान देत आहेत. याद्वारे दरवर्षी राज्यात तीनशेहून अधिक मारवाडी घोडय़ांची पैदास होत आहे, अशी माहिती केशव जोशी यांनी दिली.

मारवाडी घोडे उजवे ठरतील

मारवाडी घोडय़ांची किंमत ५० हजार रुपये ते एक कोटी रुपये या दरम्यान असू शकते. सध्या भरतातून घोडे निर्यात करण्यावर बंदी आहे. परंतु ही बंदी उठल्यास मारवाडी घोडय़ांना जागतिक पातळीवर चांगली मागणी येईल. जगप्रसिद्ध अरबी घोडय़ांच्या क्षमतेच्या तुलनेत देखील मारवाडी घोडे उजवे ठरतील, असे केशव जोशी यांनी सांगितले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 1, 2020 12:39 am

Web Title: efforts to save bhimthadi horses says ranjit pawar abn 97
Next Stories
1 वीर सावरकर यांचा उल्लेख ‘भारतरत्न’ असाच करायला हवा-शरद पोंक्षे
2 ‘फर्ग्युसनमधून किती नथुराम तयार करणार’, शरद पोंक्षेंच्या कार्यक्रमाला पुरोगामी विद्यार्थी संघटनेचा विरोध
3 जय अजित पवारही उतरणार राजकारणात?
Just Now!
X