मतदार याद्यांमधील घोळ आणि हजारो मतदारांची नावे वगळल्याच्या प्रकरणाची विशेष अधिकाऱ्यांमार्फत चौकशी करावी, तसेच वंचित मतदारांना मतदान करू द्यावे, अशा मागण्या महायुतीचे उमेदवार अनिल शिरोळे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने केंद्रीय उपनिवडणूक अधिकारी सुधीर त्रिपाठी यांच्याकडे शनिवारी दिल्लीत केल्या. या मागणीबाबत तातडीने कार्यवाही केली जाईल व तीन दिवसात कृती अहवाल तयार केला जाईल, असे आश्वासन शिष्टमंडळाला देण्यात आले.
हजारो पुणेकरांची नावे मतदार याद्यांमधून गायब झाल्याचे लोकसभा मतदानाच्या दिवशी दिसून आले. त्यामुळे मतदान केंद्रापर्यंत गेलेल्या हजारो मतदारांना मतदानापासून वंचित राहावे लागले. त्यानंतर भारतीय जनता पक्ष, शिवसेना आणि आरपीआयतर्फे हे प्रकरण तातडीने राज्य निवडणूक अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिले. तसेच अनिल शिरोळे यांनी उपोषणही केले. त्यानंतर या संबंधीची तक्रार केंद्रीय निवडणूक आयुक्तांकडेही करण्यात आली होती. या प्रकरणात महायुतीच्या शिष्टमंडळाला शनिवारी चर्चेसाठी बोलावण्यात आले होते.
भारतीय जनता पक्षाच्या प्रवक्त्या निर्मला सीतारामन, खासदार जे. पी. नड्डा, राष्ट्रीय सरचिटणीस रामकृष्णन, भाजपचे शहराध्यक्ष अनिल शिरोळे, सरचिटणीस राजेश पांडे, अॅड. विनायक अभ्यंकर, शिवसेनेचे शहर प्रमुख श्याम देशपांडे, नगरसेवक प्रशांत बधे, आरपीआयचे अध्यक्ष परशुराम वाडेकर यांच्या शिष्टमंडळाने शनिवारी दिल्लीत सुधीर त्रिपाठी यांची भेट घेऊन मतदार यादीतून नावे वगळलेल्या मतदारांना मतदानाचा हक्क द्यावा, अशी मागणी या वेळी केली. तसेच या गंभीर प्रकरणाची सखोल चौकशी करावी व त्यासाठी स्वतंत्र अधिकाऱ्याची नियुक्ती करावी, अशीही मागणी शिष्टमंडळाने केली. या संबंधी राज्य निवडणूक आयोगाकडून अहवाल मागवला जाईल, तसेच याद्यांमध्ये जे गोंधळ झाले त्याची तपासणी स्वतंत्र अधिकाऱ्यामार्फत केली जाईल, असे आश्वासन त्रिपाठी यांनी दिल्याचे भाजपतर्फे सांगण्यात आले.
यादीतून नावे गायब झालेल्या शंभरहून अधिक मतदारांची प्रतिज्ञापत्रे आवश्यक कागदपत्रांसह अॅड. विनायक अभ्यंकर यांनी निवडणूक आयोगाला सादर केली आहेत. अनेक मतदारांनी यापूर्वी अनेक वेळा मतदान केले आहे. त्यांचा निवासाचा पत्ताही बदललेला नाही, तरीही त्यांना मतदान करता आलेले नाही. ज्या मतदारांना गुरुवारी मतदान करता आले नाही, त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे पुराव्यासह तक्रार अर्ज सादर करावेत, असे आवाहन अनिल शिरोळे यांनी केले आहे.