निवडणुकीच्या निमित्ताने अखिल भारतीय मराठी नाटय़ परिषदेची झालेली बदनामी ध्यानात घेता पुणे शाखेची निवडणूक बिनविरोध व्हावी असा सूर रविवारी व्यक्त झाला. शाखेच्या सर्वसाधारण वादळी सभेत  कार्यकारिणीच्या कारभारावर ताशेरे ओढत आरोपांच्या फैरी झडल्या असल्या, तरी नाटय़क्षेत्राची प्रतिष्ठा राखण्यासाठी निवडणूक टाळणे योग्य अशी भूमिका मांडण्यात आली. पुणे शाखेच्या कार्यकारिणीची मुदत संपल्याने या निवडणुकीसाठी संयुक्त कार्यवाह भाऊसाहेब भोईर यांची नाटय़ परिषदेने मुख्य निर्वाचन अधिकारी म्हणून नियुक्ती केली आहे.
नाटय़ परिषदेच्या पुणे शाखेच्या आजीव सभासदांची सर्वसाधारण सभा झाली आणि शाखेच्या कार्यकारिणीचा कार्यकाल औपचारिकपणे संपुष्टात आला. एक हजारांपैकी ७६ सभासद या बैठकीस उपस्थित होते. यामध्ये शाखेच्या कारभारावर ताशेरे ओढण्यात आले. त्याचप्रमाणे कामकाजातील त्रुटी दाखवून देत आरोपही करण्यात आले. तर, काही सभासदांनी विधायक सूचना केल्या. बैठक संपत असताना तणाव निवळला असला, तरी शाखा अध्यक्ष डॉ. सतीश देसाई यांनी आरोपांना उत्तरे देण्याचे टाळले. एवढेच नव्हे तर, गेल्या पाच वर्षांतील कामकाजाविषयी भाष्य करीत समारोपाचा संवादही त्यांनी साधला नाही. मात्र, सर्वसाधारण सभा खेळीमेळीच्या वातावरणात झाल्याची माहिती देसाई यांनी पत्रकारांना दिली.
शाखेची मुदत संपल्यामुळे भाऊसाहेब भोईर यांची मुख्य निर्वाचन अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. ते परिषदेच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा करून निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करतील. सप्टेंबरच्या दुसऱ्या पंधरवडय़ातील रविवारी मतदान होऊन नवी कार्यकारिणी अस्तित्वात येणार असल्याचे सांगितले. नुकत्याच झालेल्या अखिल भारतीय नाटय़ परिषदेच्या निवडणुकीचे पडसाद अजूनही कायम आहेत. आरोप-प्रत्यारोपांबरोबरच बनावट मतपत्रिकांचा सुळसुळाट आणि धर्मादाय आयुक्तांपुढे झालेली सुनावणी यामुळे राजकीय नेत्यांनाही लाजवेल अशी ही निवडणूक वादग्रस्त ठरली. त्या पाश्र्वभूमीवर पुण्याची कार्यकारिणी बिनविरोध करावी, असा सूर या सभेनंतर विविध नाटय़कर्मीनी व्यक्त केला.
सभेमध्ये आलेल्या विधायक सूचना
– नाटय़निर्माता, व्यवस्थापक संघाच्या पदाधिकाऱ्यांसह कलाकारांच्या रंगमंदिरातील समस्यांसंदर्भात स्थायी समिती अध्यक्ष विशाल तांबे यांच्यासमवेत बैठक बोलवावी.
– कलाकार आणि पडद्यामागच्या कलाकारांच्या अडचणीमध्ये अर्थसाह्य़ करण्यासाठी गंगाजळी सुरू करावी.
– राज्य सरकारकडून नाटय़ परिषदेला मिळालेल्या अनुदानातील काही निधी शाखांकडे वर्ग करावा.
– शहरातील नाटय़संस्थांना नाटय़ परिषदेचे सभासद करून घ्यावे.
– महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना परिषदेच्या कामामध्ये सहभागी करून घेण्यासाठी धोरण करावे.
– नवोदित कलाकारांसाठी ‘वेगळाचि रंग माझा’ हे व्यासपीठ कायमस्वरूपी उपलब्ध करावे.