यंत्रणेच्या देखभालीचा गुरुवार

तापमानाचा पारा वाढला असताना उकाडय़ापासून वाचण्यासाठी सर्वानाच विजेची नितांत गरज आहे. दुसरीकडे यंत्रणेच्या देखभाल- दुरुस्तीची कामेही तितकीच महत्त्वाची असल्याने त्यासाठी हक्काचा दिवस म्हणून गुरुवारी महावितरणने शहरातील बहुतांश भागात वीज बंद ठेवली होती. या कालावधीत नियोजनानुसार पावसाळ्यापूर्वीची देखभाल- दुरुस्ती कामे करण्यात आल्याचे महावितरणकडून सांगण्यात आले. मात्र वाढलेला पारा लक्षात घेता रास्ता पेठ, शिवाजीनगर, कोथरूड, पर्वती, पद्मावती, पिंपरी, भोसरी आदी विभागांतील नागरिक दिवसभर उकाडय़ाने चांगलेच हैराण झाले.

वीज यंत्रणेच्या नियोजित देखभाल- दुरुस्तीची कामे करण्यासाठी गुरुवार हा ठरवून दिलेला दिवस आहे. या दिवशी आवश्यकतेनुसार ठरावीक विभागांत सहा ते आठ तासांपर्यंत वीज बंद ठेवून कामे केली जातात. सध्या पावसाळ्यापूर्वी आवश्यक असणारी कामे विविध विभागांत हाती घेण्यात आली आहेत. त्यामुळे गुरुवारी सकाळी दहा वाजल्यापासून संध्याकाळी चार ते पाच वाजेपर्यंत शहराच्या विविध भागात वीज यंत्रणेच्या देखभाल- दुरुस्तीची कामे करण्यात आली. सध्या पुणे आणि परिसरातील कमाल तापमानाचा पारा ३८ अंशाच्याही पुढे आहे. त्यामुळे अगदी सकाळपासूनच उकाडा जाणवण्यास सुरुवात होते. उकाडा वाढल्याच्या कालावधीतच वीज यंत्रणेच्या देखभाल- दुरुस्तीचा गुरुवार आल्याने दिवसभर नागरिकांची तारांबळ उडाली.

कोथरूड विभागामध्ये कर्वे रस्ता, प्रभात रस्ता, जंगली महाराज रस्ता, कोथरूड गाव, राहुलनगर, गांधी भवन परिसर, कुमार परिसर, वारजे गाव, राम नगर, गरवारे महाविद्यालय परिसर, पद्मावती विभागातील मार्केड सार्ड, काशेवाडी, बिबवेवाडी, अप्पर इंदिरा नगर , सातारा रस्ता, कोंढवा रस्ता, एलआयसी कॉलनी, सॅलिसबरी पार्क, सहकारनगर, टिंबर मार्केट, राजीव गांधी नगर, फातिमानगर, घोरपडी गाव, बाजार, कोंढवा,  शिवाजीनगर विभागातील पोलीस लाईन, मॉडेल कॉलनी, वडारवाडी, बाणेर- पाषाण लिंक रस्ता, रामनगर, बावधन, औंध रस्ता, पर्वती विभागातील काही भाग त्याचप्रमाणे पिंपरी- चिंचवडमध्येही काही ठिकाणी वीज बंद होती.