पुणे विद्यापीठाच्या अभियांत्रिकी शाखेच्या परीक्षा सुरू झाल्या, तरीही आधीच्या सत्राच्या परीक्षांचे पुनर्मूल्यांकनाचे निकाल नेहमीप्रमाणेच रखडलेले असल्यामुळे अभियांत्रिकी शाखेचे विद्यार्थी हवालदिल आहेत.
विद्यापीठाच्या अभियांत्रिकी शाखेचे निकाल गेली तीनही सत्रे उशिरा जाहीर होत आहे. निकालांमध्ये सातत्याने होणारे गोंधळ, उशिरा लागणारे निकाल यांमुळे विद्यार्थ्यांचा विद्यापीठांच्या परीक्षांवरील विश्वासाला धक्का पोहोचत आहे. त्यातच अभियांत्रिकी शाखेची सत्र परीक्षा सुरू होऊनही मागील सत्र परीक्षेच्या पुनर्मूल्यांकनाचे निकाल जाहीर झालेले नाहीत. अभियांत्रिकी शाखेची प्रथम आणि द्वितीय वर्षांची परीक्षा २ मे पासून सुरू झाली. मात्र, या दोन्ही वर्षांच्या काही विषयांचे पुनर्मूल्यांकनाचे निकाल अजूनही रखडले आहेत. वास्तविक पुढील परीक्षेचा अर्ज भरण्यापूर्वीच निकालाबाबतची परिस्थिती विद्यार्थ्यांना कळणे अपेक्षित असते. मात्र, पुढील सत्र परीक्षा सुरू होऊनही आधीच्या परीक्षांचे निकाल जाहीर झालेले नाहीत.
द्वितीय वर्ष अभियांत्रिकीच्या ३ विषयांचे पुनर्मूल्यांकनाचे निकाल बुधवारी रात्री जाहीर करण्यात आले आहेत. येत्या दोन दिवसांमध्ये दोन्ही वर्षांच्या सर्व विषयांचे पुनर्मूल्यांकनाचे निकाल जाहीर करण्यात येणार आहेत. निकाल जाहीर करण्याचे काम सुरू असून निकालाचे काम जसे पूर्ण होते आहे, त्याप्रमाणे ते विद्यापीठाच्या संकेतस्थळावर जाहीर करण्यात येत आहे, अशी माहिती परीक्षा विभागातील अधिकाऱ्यांनी दिली.