पावसाळा हा आल्हाददायक ऋतू समजला जात असला, तरी अधूनमधून पावसाची भुरभुर, कधी संततधार आणि मध्येच पडणारे कडकडीत ऊन अशा वातावरणातील चढ-उतारांमुळे शहरात साथीच्या आजारांचे प्रमाण वाढते आहे. त्यामुळे सर्दी, घसा दुखणे, ताप अशा रुग्णांमध्ये गेल्या दोन आठवडय़ांत वाढ झाल्याचे दिसून येत आहे. जंतुसंसर्गामुळे होणाऱ्या आजारांचे प्रमाण २० ते ३० टक्क्य़ांनी वाढले असल्याची माहिती शहरातील डॉक्टरांनी दिली.
जुलै महिला सुरू झाला असला तरी शहरात एकसारखा पाऊस पडत नाही, तर त्यातही चढउतार सुरूच आहे. त्यामुळे कधी ऊन, तर कधी पावसाच्या सरी असेच वातावरण अनुभवायला मिळत आहे. अशा वातावरणात नेहमीप्रमाणे लहान-मोठय़ा आजारांच्या रुग्णसंख्येत वाढ झाली आहे. त्याचबरोबर डोळे येण्याची साथही वाढली आहे. याबाबत डॉ. राजेश आनंद म्हणाले, ‘पाऊस सुरू झाल्यापासून ढगाळ वातावरणामुळे जंतुसंसर्ग पसरण्याचे प्रमाण वाढले आहे. सर्दी, ताप, अंगदुखी, खोकला, कफ अशा तक्रारींचा यात समावेश आहे. पिण्याचे पाणी गढूळ मिळत असल्यामुळे तसेच अस्वच्छतेमुळे उलटय़ा, जुलाब, कावीळ आणि टायफॉइडचे रुग्णही पाहायला मिळत आहेत. या रुग्णांमध्ये प्रामुख्याने लहान मुले आणि वयस्कर व्यक्ती आहेत. ज्या रुग्णांना सांधेदुखी आणि दम्याचा त्रास आहे त्यांचा त्रासही वाढला आहे.’
डॉ. निखिल गोखले यांनी सांगितले, ‘वातावरणातील बदलांमुळे विषाणूजन्य ताप, कणकण, घसा दुखणे, खवखवणे यांसाठी येणाऱ्या रुग्णांचे प्रमाण वाढले आहे. ज्यांना जुनाट सर्दीचा किंवा अॅलर्जीचा त्रास आहे, त्यांचा आजार वाढला आहे. हवेतून होणारा विषाणू संसर्ग पूर्णत: टाळणे शक्य नाही. पण असा संसर्ग झाल्यास त्याच्या लक्षणांमध्ये वाढ होण्याआधीच योग्य ती काळजी घ्यायला हवी.’
डॉ. भाग्यश्री मंडलिक म्हणाल्या, ‘गेल्या सातआठ दिवसांत डोळे येण्याची साथ दिसू लागली आहे. पावसाळा संपेपर्यंत या आजाराची साथ आढळते. डोळे येऊ नयेत म्हणून प्रतिबंधक उपाय नाहीत. पण घरातील एका व्यक्तीस डोळे आले असतील, तर तिचे डोळ्यांचे ड्रॉप्स दुसऱ्या व्यक्तींनी वापरू नयेत, अन्यथा साथ पसरण्याचा धोका वाढतो. याबरोबरच उलटय़ा आणि जुलाबाच्या रुग्णांची संख्याही वाढली आहे. उलटय़ा आणि जुलाब होऊ नयेत म्हणून शक्यतो बाहेरचे व उघडय़ावरील अन्नपदार्थ खाऊ नयेत.’

करण्याजोग्या काही गोष्टी..
– सर्दी, तापाची कणकण जाणवल्यास विश्रांती घ्या, भरपूर पाणी प्या.
– शक्य असल्यास अनावश्यक प्रवास व पावसात भिजणे टाळा.
– बाहेरचे उघडय़ावरचे अन्नपदार्थ खाणे टाळा.
– डोळे आलेल्या व्यक्तिचे औषधाचे ड्रॉप्स इतरांनी वापरणे टाळा.