News Flash

सचिन तेंडुलकर ग्रेट, पण सुनील गावसकर ग्रेटेस्ट – माधव गोठोसकर

आंतरराष्ट्रीय ख्यातीचे माजी अंपायर माधव गोठोसकर यांचा नुकताच पुण्यात सत्कार करण्यात आला. यावेळी त्यांनी सुनील गावसकर ग्रेटेस्ट बॅट्समन असल्याचं सांगितलं.

सुनील गावसकर आणि सचिन तेंडुलकर यांचे संग्रहीत छायाचित्र

भारतामध्ये क्रिकेट हा जर धर्म असेल तर सचिन तेंडुलकर हा क्रिकेटचा देव मानला जातो. फक्त भारतच नाही, तर जगभरात सचिन तेंडुलकरचे चाहते आहेत. तमाम भारतीयांना सचिन तेंडुलकरचा अभिमान वाटतो. सचिन खेळत असतानाही आणि तो निवृत्त झाल्यानंतरही. त्यामुळे १० पैकी ९ भारतीयांसाठी सचिन तेंडुलकर हाच सर्वकालिक महान क्रिकेटपटू असू शकेल. पण मूळचे मुंबईकर पण आंतरराष्ट्रीय ख्यातीचे माजी अंपायर माधव गोठोसकर यांचं मत मात्र या बाबतीत वेगळं आहे. माधव गोठोसकर यांच्यासाठी सचिन तेंडुलकर ग्रेटच आहे, पण त्याहीपुढे भारताचा लिटल मास्टर अर्थात माजी भारतीय क्रिकेटपटू सुनील गावसकर हे ग्रेटेस्ट आहेत. पुण्यामध्ये एका कार्यक्रमादरम्यान क्रिकेटर्स फाऊंडेशनतर्फे माधव गोठोसकर यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी ते बोलत होते.

…म्हणून गावसकर ग्रेटेस्ट!

पुण्यात झालेल्या या कार्यक्रमावेळी माधव गोठोसकर यांनी अनेक जुन्या आठवणींना उजाळा दिला. यावेळी त्यांना सचिन तेंडुलकर की सुनील गावसकर असा प्रश्न विचारला असता क्षणाचीही उसंत न घेता त्यांनी त्यांचं उत्तर दिलं. “सचिन तेंडुलकर हा ग्रेट बॅट्समन होता यात अजिबात शंका नाही. पण गावस्कर ग्रेटेस्ट होता. गावसकरने त्याच्या कारकिर्दीत हेलमेट देखील न घालता ज्या उत्तम दर्जाच्या बॉलर्सचा सामना केला, त्याची तुलना कोणत्याही काळातल्या इतर कोणत्याही क्रिकेटपटूसोबत होऊ शकत नाही”, असं गोठोसकर यावेळी म्हणाले. यावेळी बोलताना गोठोसकरांनी सुनील गावसकर यांच्या आवडलेल्या एका शतकी खेळीची आठवण देखील सांगितली. १९७२ ते १९८३ या आपल्या ११ वर्षांच्या कारकिर्दीत गोठोसकर यांनी १४ कसोटी आणि एका एकदिवसीय सामन्यामध्ये अंपायर म्हणून भूमिका बजावली आहे. यामध्ये वेगवेगळ्या बॅट्समन्सची एकूण २३ शतकं पाहिल्याचं ते सांगतात. त्यापैकी गावसकर यांच्या २९व्या शतकाची विशेष आठवण त्यांनी यावेळी सांगितली.

महान क्रिकेटपटू सुनील गावसकर टीम इंडियाचे कोच का होऊ शकले नाहीत?

गावसकरांच्या ‘त्या’ शतकाची आठवण

“मी पाहिलेल्या २३ पैकी ५ शतकं एकट्या गावसकरची होती. पण त्यातलं दिल्लीत झळकावलेलं त्याचं वैयक्तिक २९वं शतक ही माझी सर्वात आवडती खेळी आहे. ते शतक ज्या पद्धतीने गावसकरनं ठोकलं, त्यामुळे ती माझी आवडती खेळी झाली. गावसकर मला नेहमीच डिफेन्समध्ये मजबूत वाटला. पण त्याची ती खेळी तो आक्रमकपणे खेळला होता. माल्कम मार्शल आणि मायकल होल्डिंग यांचे चेंडू तो मैदानात चौफेर टोलवत होता. या शतकामुळे त्याने डॉन ब्रॅडमनच्या २९ शतकांच्या विक्रमाची बरोबरी देखील केली”, असं ते म्हणाले.

WTC FINAL पूर्वी क्रिकेटच्या देवाकडून रोहित-शुबमनला ‘खास’ टिप्स!

…आणि गोठोसकरांसमोर टोनीची बोलती बंद झाली!

वयाच्या ९२व्या वर्षी देखील माधव गोठोसकर यांना क्रिकेटचे सर्व नियम अगदी तोंडपाठ आहेत. “क्रिकेटमध्ये एकूण ४२ नियम आणि ३०० उपनियम आहेत. मी ते सगळे तोंडपाठ केले होते. एखाद्या अंपायरसाठी क्रिकेटचे सर्व नियम माहिती असणं ही किमान अट आहे”, असं ते म्हणाले. माधव गोठोसकर १९७३ मध्ये कानपूरमध्ये झालेल्या कसोटी सामन्यामध्ये अंपायर होते. यावेळी इंग्लंडचा कर्णधार टोनी ल्युईसनं त्यांच्यासोबत सबस्टिट्युटच्या नियमावरून वाद घालायला सुरुवात केली. त्यावर क्षणाचाही विलंब न करता माधव गोठोसकर यांनी त्याला सबस्टिट्युटचे नियम बोलून दाखवले. तेव्हा टोनीची बोलतीही बंद झाली! त्यानंतर जवळपास ४८ वर्षांनी गोठोसकर यांनी पुण्यात झालेल्या कार्यक्रमात त्याच पद्धतीने अजिबात न अडखळता ते सर्व नियम बोलून दाखवले आणि यंदाही समोरच्या व्यक्तींची बोलती बंद झाली!

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 20, 2021 11:47 am

Web Title: ex umpire madhav gothoskar says sachn tendulkar is great but sunil gavaskar greatest pmw 88
Next Stories
1 सर्व निर्बंध झुगारून राष्ट्रवादीच्या कार्यालयाचे उद्घाटन
2 पुणे शहरात २११, पिंपरीमध्ये २२० नवे रुग्ण
3 मंत्र्यांनी गर्दीचा मुद्दा गांभीर्याने घ्यावा!
Just Now!
X