एखाद्या रिक्षात बसल्यानंतर त्या छोटय़ाशा प्रवासात रिक्षावाल्याशी आपली कितपत ओळख होते? रिक्षात बसल्यानंतर त्या रिक्षावाल्याला हृदयविकाराचा त्रास असल्याचे प्रवाशाला कळले आणि या प्रवाशाने ओळखपाळख नसताना रिक्षावाल्याच्या शस्त्रक्रियेचा सगळा खर्च स्वत:हून केला तर?..
अशीच एक दुर्मीळ घटना नुकतीच जहाँगीर रुग्णालयात घडली. त्याविषयी रुग्णालयातर्फे माहिती देण्यात आली. पुण्यातील एक रिक्षाचालक शफीक अन्सारी २००६ पासून हृदयविकाराने ग्रस्त होते. पुण्यातील एका रुग्णालयाने त्यांना बायपास शस्त्रक्रिया करून घेण्याचा सल्ला दिला होता. पण पुरेसे पैसे नसल्यामुळे अन्सारी ती शस्त्रक्रिया टाळत राहिले. एक दिवस एक ऑस्ट्रेलियन प्रवासी स्त्री त्यांच्या रिक्षात बसली. पुढचे तीन दिवस पुण्यात फिरण्यासाठी त्या स्त्रीने अन्सारी यांच्याच रिक्षातून प्रवास करण्याचे ठरवले. या दरम्यान त्यांना बऱ्याच वर्षांपासून हृदयविकार असल्याचे तिला समजले. तिने स्वत:हून अन्सारी यांना रुग्णालयात भरती केले; विशेष म्हणजे त्यांच्या शस्त्रक्रियेचा सर्व खर्चही केला.