नव्या बीआरटी सेवेतील त्रुटी उघड

पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीत दापोडी ते निगडी या मार्गावर गेल्या शुक्रवारपासून बीआरटी सेवेला प्रारंभ करण्यात आला. मात्र तीन-चार दिवसांतच या सेवेतील त्रुटी समोर आल्या असून बंद पडणाऱ्या पीएमपीच्या गाडय़ांमुळे बीआरटी सेवेत अडथळा निर्माण होत आहे.

बीआरटी मार्गात सोमवारी दुपारी साडेचारच्या सुमारास बीआरटी मार्गात पीएमपीची एक गाडी नादुरुस्त झाली. त्यामुळे पाठीमागून आलेल्या गाडय़ा बीआरटी मार्गात अडकून गाडय़ांच्या रांगा लागल्या होत्या. त्यामुळे प्रवाशांचीही मोठी गैरसोय झाली.

गेल्या काही वर्षांपासून बीआरटी सेवेची सुरुवात करण्याच्या फक्त तारखा जाहीर केल्या जात होत्या. बीआरटी सेवेला गेल्या आठवडय़ात शुक्रवारपासून प्रारंभ करण्यात आला. दापोडी ते निगडी दरम्यानच्या बारा किलोमीटर मार्गावर प्रायोगिक तत्त्वावर ही सेवा सुरू करण्यात आली.

मात्र, तीन-चार दिवसांतच या सेवेतील त्रुटी सोमवारी स्पष्ट झाल्या. महापालिकेच्या समोर पिंपरी मोरवाडी चौकात निगडीकडे जाणारी पीएमपीची एक गाडी बीआरटी मार्गात अचानक बंद पडली. पीएमपी बंद पडल्याचे पाठीमागून येणाऱ्या पीएमपी चालकांना माहिती नव्हते.

त्यामुळे बीआरटी मार्गातून निगडीकडे जाणऱ्या गाडय़ा या मार्गात येत होत्या. सर्व पीएमपी गाडय़ांमध्ये प्रवाशांची गर्दी होती. सात ते आठ गाडय़ा बीआरटी मार्गात अडकून पडल्या होत्या. या अडकलेल्या गाडय़ा पाठीमागे पिंपरीपर्यंत घेऊन जाता येत नव्हत्या. त्यामुळे सर्व गाडय़ांमधील प्रवासी थांब्यांवर उतरवून दुसऱ्या गाडय़ांमध्ये त्यांच्या पुढील प्रवासासाठीची व्यवस्था करण्यात आल्याचे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले.

प्रवाशांची फरफट

काही दुचाकी आणि इतर खाजगी वाहनेही या मार्गात अडकून पडली होती. ब्रेक डाऊन बस वेळेवर आली नाही. त्यामुळे सात ते आठ गाडय़ा बीआरटी मार्गामध्ये अडकून पडल्या आणि प्रवाशांचे हाल झाले. पाऊण तासाने बंद गाडी बीआरटी मार्गातून बाजूला काढल्यानंतर बीआरटी मार्गातील वाहतूक सुरू झाली. बीआरटी मार्गावर मेट्रोच्या कामामुळे बहुतांश ठिकाणी अडथळे असताना नादुरुस्त पीएमपीमुळे प्रायोगिक तत्त्वावरील बीआरटी सेवेतही त्रुटी निर्माण होत आहेत. त्याचा फटक प्रवाशांना बसत आहे.