अर्थव्यवस्थेतून बनावट नोटा हद्दपार करण्यासाठी देशात नोटबंदी करण्यात आली. मात्र, बनावट नोटा छापणारे नोटबंदीलाही वाकुल्या दाखवत असल्याचाच एक प्रकार समोर आला आहे. ‘१ लाख रुपये द्या आणि ५ लाख रुपये रकमेच्या बनावट नोटा घ्या’, अशा पद्धतीने बाजारात बनावट नोटा वाटणाऱ्या एका टोळीचा पर्दाफाश करण्यात पिंपरी-चिंचवड पोलिसांना यश आलं आहे. या रॅकेटचे धागेदोरे गुजरातपर्यंत असल्याचं तपासातून समोर आल्यानंतर पिंपरी-चिंचवड पोलिसांनी गुजरातमध्ये जाऊन कारवाई केली. या कारवाई ३२ लाखांच्या बनावट नोटा जप्त करण्यात आल्या असून, मुख्य आरोपीला अटक केली आहे.

पिंपरी-चिंचवड पोलिसांनी बनावट नोटा छापणाऱ्या टोळीचा गुजरातमध्ये जाऊन पर्दाफाश केला आहे. त्याची सुरुवात निगडी येथून झाली होती. ही टोळी एक लाख रुपयांच्या बदल्यात पाच लाखांच्या बनावट नोटा द्यायची, असं पोलीस तपासात समोर आलं आहे. टोळीच्या मुख्य सूत्रधारांसह एकुण सहा जणांना बेड्या ठोकण्यात निगडी पोलिसांना यश आलं आहे. या टोळीकडून ३२ लाखांच्या बनावट नोटा जप्त करण्यात आल्या आहेत.

पुण्यातला ‘मुळशी पॅटर्न’: भरदिवसा कोयता हातात घेऊन तरुणाचा पाठलाग; डोक्यात दगड घालून हत्या

मुख्य आरोपी राजू उर्फ रणजित सिंह खतुबा परमार, गोरख दत्तात्रय पवार, विठ्ठल गजानन शेवाळे, जितेंद्र रंकनीधी पाणीग्रही, जितेंद्रकुमार नटवरभाई पटेल, किरण कुमार कांतीलाल पटेल अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. या आरोपीमध्ये विठ्ठल शेवाळे हा वन अधिकारी असून, काही महिन्यांपूर्वी तो लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यातही सापडला होता. यातील तीन आरोपींना गुजरातमधून अटक करण्यात आली आहे.

सोशल मीडियावरून पाठवायचा व्हिडीओ

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुख्य आरोपी राजू परमार हा या टोळीचा मोरक्या आहे. त्यानेच जितेंद्रकुमार पटेल आणि किरण कुमार पटेल या तरुणांकडून बनावट नोटा छापून घेतल्या होत्या. तो बनावट नोटांचा आकर्षित व्हिडिओ बनवून व्हॉटसऍपवर ओळखीच्या व्यक्तींना पाठवायचा. त्याचा फायदा तो समोरील व्यक्तींना पटवून द्यायचा. दरम्यान, समोरच्या व्यक्तीसोबत मीटिंग बोलवायचा. त्यामध्ये मात्र, परमार हा खऱ्याखुऱ्या २० हजारांच्या नोटा आणायचा जेणेकरून समोरच्या व्यक्तीला बनावट नोटांवर विश्वास बसायचा. २० हजारांच्या खऱ्याखुऱ्या नोटा बनावट असल्याचं सांगून तुम्ही मार्केटमध्ये चालवा, असं म्हणून तो निघून जायचा. याच नोटा बाजारात चालायच्या आणि अशा पद्धतीने परमार समोरील व्यक्तीचा विश्वास संपादन करायचा.

राजू परमार हा एका लाखांच्या बदल्यात पाच लाखांच्या बनावट नोटा देत असे. दरम्यान, करार पूर्ण झाल्यानंतर परमार काही हजारांच्या नोटा खऱ्या ठेवायचा. पोलिसांची भीती दाखवून नोटांच्या बंडलवर चिकट टेप जास्त लावून तुम्ही इथून निघून जा, असं सांगून तो फरार व्हायचा. दोन्ही पटेल नावाच्या तरुणांनी तब्बल ५० ते ६० लाखांच्या बनावट छापल्या होत्या, असं देखील पोलीस तपासात समोर आलं आहे. सर्व आरोपी हे एकमेकांना केवळ फोनवरून ओळखायचे, ते समोरासमोर कधीच आलेले नाहीत. फसवणुकीचं काम अशा साखळी पद्धतीने चालायचं आणि मिळेल तेवढं कमिशन ते आपापसात वाटून घ्यायचे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक गणेश जवादवाड यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक लक्ष्मण सोनवणे, आर.बी बांबळे यांच्या पथकाने बनावट नोटा छापणाऱ्या आणि वाटणाऱ्या टोळीचा पर्दाफाश केला.