‘चर्चमधील राजकारण हे पक्षीय राजकारणापेक्षा वाईट आहे. ख्रिश्चन समाजाला मोदींपेक्षा आपल्याच समाजातील दुहीचा धोका जास्त आहे,’ असे मत ज्येष्ठ साहित्यिक फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांनी मंगळवारी व्यक्त केले. ख्रिस्त प्रेम सेवा आश्रमातील वाचनालयाच्या मराठी दालनाच्या उद्घाटनप्रसंगी फादर दिब्रिटो बोलत होते.
या आश्रमाला ८८ वर्षे झाली आहेत. येथील वाचनालयात सहा हजार इंग्रजी पुस्तके आहेत. मराठी वाचक वाढत असल्यामुळे स्वतंत्र मराठी दालनाचे फादर दिब्रिटो यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले.
अभिव्यक्तिस्वातंत्र्य असल्यामुळेच आपण बोलू लागलो आहोत, हे महत्त्वाचे असल्याचे सांगून फादर दिब्रिटो म्हणाले की, एकत्र येण्याची चर्चची पद्धत चांगली आहे. निदान त्यामुळे तरी दर रविवारी आपण एकमेकांना भेटत असतो. ऐक्य महत्त्वाचे आहे. परंतु, आज आपल्या समाजाला मोदींपेक्षा आपल्यातील दुहीचाच धोका जास्त आहे. स्वतंत्र पक्ष काढून काहीही उपयोग होणार नाही, कारण असा पक्ष फोडायला वेळ लागत नाही. देशात सध्या जे घडत आहे ते चिंताजनक आहे. कारण त्यामागे एक सूत्र आहे. त्यांचा ‘अजेंडा’ आहे. बाह्य़ परिस्थितीमुळे आपण एकत्र येत आहोत. आपल्या समाजातून उद्योजक घडले पाहिजे. त्यासाठी त्यांनी सामाजिक बांधिलकीही ठेवली पाहिजे.
समाजातील तरुणांना नोकऱ्या मिळत नाहीत यावर भाष्य करताना फादर दिब्रिटो म्हणाले की, स्पर्धा मोठी आहे. पूर्वतयारीत आपण कमी पडतो. उमेदवार सक्षम नसल्याने त्यांना नोकऱ्या मिळत नाहीत. यासाठी समाजात प्रयत्न होणे गरजेचे आहे. प्रशिक्षण केंद्र चालविली पाहिजेत. केंद्र सरकारच्या आपल्यासाठी अनेक योजना आहेत, त्यांचा आपण फायदा घेत नाही. त्यामुळे योजनांचा निधी परत जातो. आरक्षण नसले तरी सुविधा भरपूर आहेत. उद्योजक नितीन काळे यांनी ओळख करून दिली, तर प्रास्ताविक व आभार प्रदर्शन आश्रमाचे प्रशासक संतोष साळवी यांनी केले.