‘स्पॉटफिक्सिंग’ हा काय प्रकार आहे, आम्हाला कधी कळलाच नाही. कमरेला रुमाल लावणे, विशिष्ट खाणाखुणा करण्याची फिक्सिंग टीव्हीवर पाहिल्यानंतर समजली. शरद पवार यांनी ‘आयपीएल’ ला एका विशिष्ट उंचीवर नेऊन ठेवले. मात्र, ‘त्या’ खेळाडूंनी काळीमा फासण्याचे काम केले, अशी प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भोसरीत व्यक्त केली.
पिंपरी महापालिकेच्या विविध विकासकामांचे उद्घाटन केल्यानंतर भोसरीतील जाहीर कार्यक्रमात ते बोलत होते. महापौर मोहिनी लांडे, आमदार विलास लांडे, लक्ष्मण जगताप, आयुक्त डॉ. श्रीकर परदेशी आदी यावेळी उपस्थित होते. पवार म्हणाले,
पिंपरी-चिंचवडलगत गहुंज्याला २५० कोटींचे स्टेडियम उभे राहिले. काही वर्षांपूर्वीपर्यंत कोणाला हे शक्य होईल, असे वाटले नसते. मात्र, शरद पवार यांनी ते वास्तवात उतरवून दाखवले. क्रिकेटसाठी महत्त्वपूर्ण निर्णय घेत पवार यांनी ‘आयपीएल’ ला एका विशिष्ट उंचीवर नेले. मात्र, काही खेळाडूंनी स्वत:च्या स्वार्थासाठी काळीमा फासण्याचा प्रकार केला, त्यांना शिक्षा झालीच पाहिजे. घटनेनुसार सर्वाना समान न्याय असला पाहिजे. सुनील दत्त, नर्गिस यांच्यासारख्या कर्तृत्ववान कलावंतांचा संजय दत्त हा मुलगा आहे. मात्र आज तो येरवडय़ाच्या तुरुंगात आहे. चुकीचे काम केले की शिक्षा होणारच आहे, तोच न्याय फिक्सिंगमधील खेळाडूंना लावला पाहिजे, असे ते म्हणाले.
राज्यात काहींनी मराठी भाषेवरून तर, काहींनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने राजकारण चालवले आहे. शिवसृष्टी उभारणे, गड-किल्ल्यांमध्ये सोयीसुविधा निर्माण करणे, यापेक्षा त्यांनी कायम भावनेचे राजकारण केले. भाजप-शिवसेना हे जातीयवादी पक्ष आहेत. मनसे माथी भडकावण्याचे काम करते, त्यांचे हे राजकारण औटघटकेचे आहे. मुंबई महापालिका शिवसेनेकडे, नाशिक पालिका मनसेकडे आहे. त्यांनी काय दिवे लावले, तेथे बकालपणाच आहे. लोकांना बरे वाटेल, असे नुसतेच बोलण्यापेक्षा विकासाची कामे व कृतिशील कार्यक्रमावर भर दिला पाहिजे. राज्यात भीषण दुष्काळी परिस्थिती असून त्यावर मात करण्याचा राज्य शासनाचा प्रयत्न सुरू आहे. मुख्यमंत्री व आपण दौरा केला, तेव्हा १५-१५ दिवस पाणी नाही, असे भाग आढळून आले, असे ते म्हणाले.