पिंपरी-चिंचवडमध्ये आगीच सत्र सुरूच असून पिंपळे गुरव भागात आज सायंकाळी साडेचारच्या सुमारास दुकानांना भीषण आग लागली. आगीमध्ये तीन दुकानं भस्मसात झाली. तर दोन दुकानांच मोठं नुकसान झालं आहे. या घटनेची माहिती समजताच अग्निशमन दलाच्या तीन गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. एक तासाच्या अथक प्रयत्नानंतर आग आटोक्यात आणण्यात अग्निशमन दलाच्या जवानांना यश आले. आगीमुळे लाखो रुपयांचे नुकसान झाले असल्याची माहिती मिळत आहे. सर्व दुकाने बंद असल्याने मोठी जीवितहानी टळली.

अधिक माहिती अशी की, रविवारी सायंकाळी साडेचार वाजण्याच्या सुमारास पिंपळे गुरव येथील रामकृष्ण मंगल कार्यालयाजवळ पाच दुकानांना भीषण आग लागली. या आगीमध्ये दोन आइसक्रीम पार्लर, एक स्टेशनरी दुकान, कपड्याचे दुकाने जळून खाक झाली. तर दोन दुकानांना आगीची झळ पोहोचल्याने मोठे नुकसान झाले. आगीचे वृत्त समजताच अग्निशमन दलाच्या तीन गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. एक तासाच्या अथक प्रयत्नानंतर आग आटोक्यात आली. आइस्क्रीम पार्लरमध्ये नेहमी गर्दी असते. परंतु, आज दोन्ही दुकानं बंद होती, यामुळे मोठी जीवितहानी टळली आहे. गेल्या दोन दिवसात आगीची पिंपरी-चिंचवड शहरातील ही तिसरी घटना आहे.

दोन दिवसांपासून शहरात आगीच्या घटना
मोशीमध्ये कचरा डेपोला भीषण आग लागली होती तर काळेवाडी मध्ये चिक्कीच्या गोदामातील गॅस सिलिंडरचा स्फोट होऊन गोदामाला भीषण आग लागली होती. यात एक कामगार जखमी झाला होता.