करोनाच्या पाश्र्वभूमीवरील टाळेबंदीच्या कालावधीत आपापल्या राज्यात गेलेले कामगार, मजूर हळूहळू शहराकडे परतू लागले आहेत. टाळेबंदीनंतर पहिल्यांदाच पटना (दानापूर) येथून पुण्यासाठी सोडण्यात आलेली रेल्वे शुक्रवारी सकाळी पुणे स्थानकावर पोहोचली. या गाडीतून सुमारे १२०० प्रवासी पुण्यात दाखल झाले. दुसऱ्या दिवशीही तितकेच प्रवासी घेऊन गाडी दाखल झाली. दानापूर येथून ही गाडी आता दररोज पुण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे गोवा एक्स्प्रेसच्या माध्यमातून भोपाळमधूनही प्रवासी पुण्यात येऊ लागले आहेत.

टाळेबंदीमध्ये रोजगार बंद झाल्यानंतर विविध मार्गाने कामगार आणि मजुरांनी आपापल्या राज्यामध्ये धाव घेतली. या मंडळींची मागणी लक्षात घेता केंद्र शासनाने घेतलेल्या निर्णयानुसार राज्य शासनाच्या नियोजनात १ मेपासून श्रमिक रेल्वे गाडय़ा सुरू करण्यात आल्या. आजपर्यंत पुण्यासह राज्यातील विविध रेल्वे स्थानकावरून शेकडो श्रमिक रेल्वे गाडय़ा उत्तर प्रदेश, बिहार, मध्य प्रदेश, पश्चिम बंगाल आदींसह देशाच्या विविध भागांत सोडण्यात आल्या. त्यातून लाखो प्रवासी आपापल्या राज्यात रवाना झाले आहेत. श्रमिक गाडय़ा वगळता रेल्वेकडून १ जूनपासून देशभरातून विशेष रेल्वे गाडय़ा सुरू करण्यात आल्या आहेत. श्रमिक रेल्वे केवळ एकाच दिशेने सोडण्यात आल्या.

मात्र, या विशेष गाडय़ा दैनंदिन पद्धतीने दोन्ही बाजूने सुरू करण्यात आल्या आहेत. पुणे विभागाला त्यात पुणे-दानापूर (पटना, बिहार) ही एक गाडी देण्यात आली आहे. पुण्यातून दानापूरसाठी पहिली गाडी १ जूनला सोडण्यात आली. त्यानंतर दानापूरहून पुण्यासाठी ३ जूनला पहिली गाडी सोडण्यात आली. ही गाडी शुक्रवारी (५ जून) सकाळी साडेपाचच्या सुमारास पुणे स्थानकावर पोहोचली. त्यातून सुमारे १२०० प्रवासी पुण्यात पोहोचले. टाळेबंदीमध्ये सध्या विविध बाबतीत सूट देण्यात येत आहे. उद्योग, रोजगार आणि दुकानेही काही अटींवर सुरू झाले आहेत. अशा स्थितीत  राज्यात गेलेले काही कामगार परतू लागले आहेत.

करोनाबाबत रेल्वेकडून दक्षता

करोना विषाणूचा फैलाव रोखण्याच्या दृष्टीने श्रमिक रेल्वे गाडय़ांप्रमाणेच विशेष गाडय़ांबाबतही दक्षता घेतली जात असल्याचे रेल्वेकडून स्पष्ट करण्यात आले आहे. प्रवाशाच्या योग्य तपासणीसाठी गाडीच्या वेळेपूर्वी दीड तास स्थानकावर प्रवेश बंधनकारक करण्यात आला आहे. येणाऱ्या आणि जाणाऱ्या प्रवाशांसाठी वेगळ्या प्रवेशद्वारांची व्यवस्था आहे. सर्दी, खोकला, ताप आदी लक्षणे असणाऱ्यांनी प्रवास न करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. तपासणीत गंभीर लक्षणे आढळल्यास संबंधिताला प्रवास नाकारण्यात येत आहे.