उल्हासनगर : उल्हासनगर शहराच्या पहिल्या महिला आमदार ज्योती कलानी यांचे रविवारी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले.  त्या ७० वर्षांच्या होत्या. उल्हासनगर शहराचे माजी आमदार आणि गुन्हेगारी पार्श्वभूमी मुळे कायम चर्चेत राहिलेल्या सुरेश ऊर्फ पप्पू कलानी यांच्या त्या पत्नी होत्या.  त्यांच्या पश्चात दोन मुली, एक मुलगा, सून आणि नातवंडे असा परिवार आहे.

उल्हासनगरात राष्ट्रवादी काँग्रेसमधून  नगरसेविका, नगराध्यक्षा, महापौर, सलग सात वेळा स्थायी समिती सभापती आणि आमदार अशा भूमिका बजावलेल्या त्या एकमेव महिला लोकप्रतिनिधी होत्या. पप्पू कलानी तुरुंगवासात असताना ज्योती कलानी यांनी त्यांची राजकीय परंपरा शहरात चालवली.  २०१९च्या विधानसभा निवडणुकीत अवघ्या काही मताने त्यांचा पराभव झाला होता. रविवारी सायंकाळी त्यांच्या राहत्या घरी त्यांना हृदयविकाराचा झटका आला. त्यातच त्यांचे निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर सोमवारी अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.