‘‘माझ्या हृदयाला छिद्र आहे.. आम्ही गरीब असल्यामुळे माझ्या वडील व काकांनी मदतीसाठी खूप प्रयत्न केले, पण आमच्या पदरी निराशाच पडली.. कुणी म्हणते मोठय़ा अधिकाऱ्याची चिठ्ठी आणा, तर कुणी म्हणते अडीच लाखांची तयारी ठेवा.. मला जगायचे आहे.. तुम्ही सांगितले तर माझ्या बाबांकडे पैसे मागणार नाहीत..’’ हडपसरमध्ये राहणाऱ्या कामगार कुटुंबातील दुसरीत शिकणाऱ्या मुलीने थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लिहिलेले हे पत्र.

पंतप्रधान कार्यालयातील संचालक डॉ. श्रीकर परदेशी यांचे ‘शासनाच्या योजनांमधून वैशालीवर योग्य उपचार व्हावेत,’ असे सांगणारे पत्र २४ मे रोजी पुण्याच्या जिल्हाधिकारी कार्यालयाला मिळाले आणि तिच्या मोफत शस्त्रक्रियेसाठी भराभर पुढची चक्रे फिरली. वैशाली मोनीश यादव (वय ६) असे या मुलीचेनाव आहे. पंतप्रधान कार्यालयातून आलेले पत्र जिल्हाधिकाऱ्यांनी कार्यवाहीसाठी जिल्हा शल्यचिकित्सकांकडे दिले. या पत्राबरोबर वैशालीने हिंदीत लिहिलेले पत्र आणि तिच्या

शाळेच्या ओळखपत्राची प्रतही जोडली होती. हे पत्र आल्यानंतर मुलीची शस्त्रक्रिया होऊन तिला घरी सोडणे हे सारे ९ दिवसांच्या अवधीत घडले. ७ जूनला वैशालीला रुबी हॉल रुग्णालयातून घरी सोडण्यात आले.

जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. संजय देशमुख म्हणाले, ‘‘शाळेच्या ओळखपत्राच्या साहाय्याने आम्ही प्रथम तिच्या शाळेत पोहोचलो व तिच्या घरीही गेलो. राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमाच्या डॉक्टरांची त्यात मोठी मदत झाली. तिची शस्त्रक्रिया राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजनेतून होऊ शकेल का याची तपासणी करण्यात आली, परंतु त्यांच्याकडे रेशन कार्ड नव्हते. तहसीलदारांकडून उत्पन्नाचा दाखलाही आम्ही मिळवला, परंतु या योजनेसाठी रेशन कार्ड लागत असल्यामुळे पुन्हा प्रश्न निर्माण झाला. दोन दिवसांनंतर धर्मादाय आयुक्तांकडे रुग्णालयांची बैठक होती. त्या ठिकाणी मी संबंधित मुलीला व पालकांनाही घेऊन गेलो. धर्मादाय आयुक्तांनी रुग्णालयांना आवाहन केल्यावर रुबी हॉलने मोफत शस्त्रक्रियेस संमती दाखवली व लगेच मुलीला रुग्णालयात दाखल करण्यात आले.’’