माणूस आणि नियती यांच्या खेळाचे वर्णन आपल्या कथांतून करणारे जी. ए. कुलकर्णी हे तत्त्वचिंतक लेखक होते, अशा शब्दांत ज्येष्ठ समीक्षक प्रा. रा. ग. जाधव यांनी रविवारी ‘जीएं’चा गौरव केला.
पुणे ऐतिहासिक वास्तू स्मृती समितीतर्फे जी. ए. कुलकर्णी यांच्या निवासस्थानी नीलफलकाचे अनावरण प्रा. जाधव यांच्या हस्ते झाले. महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या कार्याध्यक्षा डॉ. माधवी वैद्य, प्रमुख कार्यवाह प्रकाश पायगुडे, कोशाध्यक्ष सुनील महाजन, प्रसिद्ध कवयित्री डॉ. अरुणा ढेरे, हेमलता अंतरकर, संजीव कुलकर्णी, समितीचे वसंत िपगळे, अविनाश कुलकर्णी आणि जीएंच्या भगिनी नंदा पैठणकर या प्रसंगी उपस्थित होते.
मराठीतील सर्वश्रेष्ठ कथाकार हे बिरुद जीएंना लागू पडते, असे सांगून प्रा. जाधव म्हणाले,‘‘ कथा या वाङं्मय प्रकारासाठी त्यांनी आपले जीवन वाहून घेतले. जीए ज्यांना आवडले त्यांना ते विलक्षण आवडले, हेच त्यांच्या गारुड करणाऱ्या कथांचे वैशिष्टय़ आहे. आधुनिक माणसाच्या अहंपणाला नकार देणाऱ्या जीएंच्या कथा प्रत्येक वेळी नव्याने प्रतित होतात.’’
जीएंविषयीचे साहित्य संकेतस्थळावर नेणारे संजीव कुलकर्णी यांनी जीएंचे साहित्य ऑडिओ बुकच्या माध्यमातून जगभर पोहोचविण्याची आवश्यकता असल्याचे मत व्यक्त केले. वसंत िपगळे यांनी सूत्रसंचालन केले. नंदा पैठणकर यांनी आभार मानले.