खाकी वर्दीतील अनेक हौशी गायक कलाकार आपण आजवर पाहिले आहेत. जनतेच्या सुरक्षेसाठी सदैव तयार असलेले हे रक्षक आपले विविध छंदही जोपासताना दिसत आहेत. पुणे पोलिसांतील क्राईम युनिट-४ चे कॉन्स्टेबल सागर घोरपडे यांनाही गायनाचा छंद असून गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर लोकसत्ता ऑनलाइनने तो समोर आणला आहे.

कॉन्स्टेबल सागर घोरपडे गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर ‘गण गण गणराया रे, तेरा ही साया है….’ हे गाण घेऊन आले आहेत. विशेष म्हणजे सध्याचं करोनाचं संकट त्यांच्यावरही ओढवलं होतं. घोरपडे यांना करोनाची लागण झाली होती मात्र त्यावर यशस्वीरित्या मात करून ते पुन्हा कर्तव्यावर रुजू झाले आहेत.

लोकसत्ता ऑनलाइनशी बोलताना ते म्हणाले, “आमच्या घरात लहानपणापासूनच अध्यात्माचं वातावरण होतं आणि त्यातून माझ्यात गायनाची आवड निर्माण झाली. त्यानंतर मी गायनाचं रितसर शिक्षणही घेतलं. त्यानंतर मी पोलीस विभागात रुजू झालो आणि आता सेवेचा सात वर्षाचा काळही लोटला. पोलीस दलात असतानाही मी माझी गायनाची आवड झोपासली. यासाठी मला पोलीस दलातील अनेकांनी सहकार्य केले. आजवर मी अनेक गाणी सादर केली. आता मी सर्वांसमोर गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर ‘गण गण गणराया रे, तेरा ही साया रे’ हे गाण घेऊन आलो आहे. हे गाण काही तासांत तयार झालं असून त्याला सर्वांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. यापुढील काळातही आपल्या सर्वासाठी गाणं घेऊन येत राहील, अशी इच्छाही त्यांनी व्यक्त केली.

करोनावर मात करून कर्तव्यावर रुजू

पोलिसांच्या क्राइम ब्रांच युनिट चारमध्ये मी काम करीत असल्याने शहरातील प्रतिबंधित क्षेत्रांमध्ये कर्तव्य बजावत होतो. दरम्यान, मला करोनाची लागण झाली, त्यावर यशस्वी उपचार घेऊन मी बाहेर पडलो आणि आता पुन्हा त्याच जोशात कर्तव्यावर रुजू झालो आहे, असे घोरपडे यांनी लोकसत्ता ऑनलाइनशी बोलताना सांगितले. आठ दिवसापूर्वीच त्यांनी एका करोनाबाधित रुग्णाला प्लाझ्मा दान करीत समाजिक भानही जपले आहे. त्यामुळे जे नागरिक या आजारातून बाहेर पडले आहेत. त्या सर्वांनी प्लाझ्मा देण्यासाठी पुढे यावं तसंच या उत्सव काळात बाहेर न पडता, घरूनच ऑनलाइन सण साजरा करण्याचे आवाहनही त्यांनी केलं.