01 March 2021

News Flash

दुष्काळग्रस्तांच्या दु:खावर गणेश मंडळांची फुंकर!

काही मंडळांनी देखाव्याचा खर्च कमी करून मदतीसाठी रोख रक्कम बाजूला काढली आहे.

राज्यातील दुष्काळाची झळ सर्वानाच बसत असून शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहण्यासाठी पुण्यातील गणेश मंडळे सरसावली आहेत. विघ्नहर्त्यां गणरायाचा उत्सव साजरा करताना वर्गणीतील काही हिस्सा देत दुष्काळग्रस्तांच्या दु:खावर फुंकर घालीत कार्यकर्त्यांनी सामाजिक जाणिवेचा दाखला दिला आहे. त्याचप्रमाणे, अनेक सार्वजनिक मंडळे आणि सोसायटय़ांनीही दुष्काळ, पाणीटंचाई या विषयांवर देखावे सादर करून वस्तुस्थिती मांडली आहे.
दुष्काळाचे संकट उभे ठाकले असून त्याबाबतची संवेदनशीलता समाजाच्या सर्व घटकांमध्ये वाढू लागली आहे. नाना पाटेकर आणि मकरंद अनासपुरे यांच्यासारख्या वलयांकित अभिनेत्यांच्या मदतीनंतर वैयक्तिकरीत्या अर्थसाह्य़ करणाऱ्यांच्या संख्येमध्ये वाढ होताना दिसत आहे. संवेदनशील आणि समंजस कार्यकर्ते घडविणारी कार्यशाळा असा लौकिक असलेल्या गणेशोत्सवातील कार्यकर्तेदेखील यामध्ये आघाडीवर आहेत. यंदा राज्यावर दुष्काळाचे सावट असताना आपण गणेशोत्सव जल्लोषात कसा साजरा करायचा असा विचार करीत अनेक मंडळांनी दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी हात पुढे केले आहेत. काही मंडळांनी नाना पाटेकर आणि मकरंद अनासपुरे यांच्या ‘नाम’ संस्थेमार्फत दुष्काळग्रस्तांसाठी मदत निधी किंवा धान्याचे संकलनाचे वितरण करण्याचे ठरविले आहे.
काही मंडळांनी देखाव्याचा खर्च कमी करून मदतीसाठी रोख रक्कम बाजूला काढली आहे. तर, काही मंडळांनी धान्य गोळा करून संकटग्रस्त गावातील नागरिकांना मदत करण्याचा विचार अंमलात आणला आहे. जी मंडळे वर्गणी काढत नाहीत त्या मंडळाच्या कार्यकर्त्यांनी ‘एक मूठ धान्य’ गोळा करून दुष्काळग्रस्त भागामध्ये पाठविण्यासाठी जे आवाहन केले त्याला पुणेकरांकडून चांगला प्रतिसाद लाभत आहे. काही मंडळांनी तर मंडपाचा खर्च न करता मंडळाच्या मंदिरामध्येच गणरायाची प्रतिष्ठापना करून उत्सव साधेपणाने केला आहे. एकूणच मंडळाच्या कार्यकर्त्यांच्या सामाजिक बांधिलकीला नागरिकांकडूनही सहकार्याचा सेतू उभारण्यासाठी मदत मिळत आहे.
नवी पेठ येथील शिवरत्न मित्र मंडळ आणि शिवोदय मित्र मंडळ या दोन मंडळांनी मांडव घालून देखावा किंवा विद्युत रोषणाई यासाठी होणारा खर्च जाणीवपूर्वक टाळला आहे. दुष्काळग्रस्तांना मदत करण्यासाठी ही दोन्ही मंडळे एकत्र आली असून ‘एक मूठ धान्य शेतकऱ्यांसाठी’ हा उपक्रम २८ सप्टेंबपर्यंत राबविला जाणार आहे. मंडळाचे कार्यकर्ते घरोघरी जाऊन नागरिकांकडून धान्य गोळा करीत आहेत. पाच हजार किलो धान्य संकलित करण्याचे उद्दिष्ट ठेवले असून गणेश विसर्जनानंतर कार्यकर्ते दुष्काळग्रस्त भागामध्ये जाऊन धान्याचे वाटप करणार आहेत, असे गणेश लोळगे यांनी सांगितले.
डेक्कन जिमखाना परिसरातील आझाद हिंदू मित्र मंडळ ट्रस्टने दुष्काळग्रस्त शेतकरी बांधवांच्या किमान एक वेळच्या जेवणाची सोय व्हावी या उद्देशातून खर्चामध्ये बचत करून दोन हजार किलो अन्नधान्य वाटप करण्याचे ठरविले आहे. नगर जिल्ह्य़ाच्या कर्जत तालुक्यातील दुष्काळग्रस्त गावांमध्ये त्या भागात सामाजिक कार्य करणाऱ्या विद्या ग्रामविकास संस्थेच्या मदतीने ऋषिपंचमीच्या दिवशी (१८ सप्टेंबर) धान्याचे वाटप करण्यात आले, असे मंडळाचे अध्यक्ष अनिल पायगुडे यांनी सांगितले.
वैविध्यपूर्ण सांस्कृतिक कार्यक्रमांनी नटलेला असा लौकिक असलेल्या सुभाषनगर मित्र मंडळातर्फे यंदा दुष्काळाच्या पाश्र्वभूमीवर साधेपणाने गणेशोत्सव साजरा केला आहे. सांस्कृतिक कार्यक्रम रद्द करून अन्य खर्चामध्येही बचत केली आहे. ही रक्कम दुष्काळग्रस्तांना देण्याच्या उद्देशातून ४ ऑक्टोबर रोजी होणाऱ्या बैठकीमध्ये निर्णय घेण्यात येणार असल्याची माहिती विनायक धारणे यांनी दिली.
विसर्जन मिरवणुकीचे आकर्षण असलेली ढोल-ताशा पथकेही या सामाजिक उपक्रमामध्ये सहभागी होत आहेत. यंदा मिरवणुकीत वादनासाठी मिळणाऱ्या मानधनातील काही भाग दुष्काळग्रस्तांसाठी देण्याचा निर्णय ढोल-ताशा पथकांनी घेतला आहे. स्व-रूपवर्धिनी ढोल-ताशा पथकाने काही मानधन एका दुष्काळग्रस्त गावाला देण्याचा मनोदय व्यक्त केला आहे. केवळ आपल्याच पातळीवर हा निर्णय न ठेवता अन्य ढोल-ताशा पथकांनाही यामध्ये सहभागी करून घेण्यासाठी स्व-रूपवर्धिनीने पुढाकार घेतला आहे.
आमचाही खारीचा वाटा
गणपतीच्या निमित्ताने केवळ सार्वजनिक मंडळे किंवा सोसायटय़ाच नव्हे, तर वैयक्तिक पातळीवरही काहींनी दुष्काळग्रस्तांसाठी मदत गोळा करणे सुरू केले आहे. ‘नाम’ यांच्या व्हॉट्सअपवरील आवाहनाला सिंहगड रस्त्यावरील सन एम्पायर येथे राहणाऱ्या नंदिनी भुवड यांनी प्रतिसाद दिला आणि घरातील गणपतीसमोर ‘नको मला मोदक पेढे, नको गोड खाऊ, दुष्काळातही जगू दे माझा शेतकरी भाऊ’ असा फलक लावला. तेथील दानपेटीत पैसे टाकून अनेकांनी मदतीत आपला खारीचा वाटा उचलला. या उपक्रमापासून प्रेरणा देत चंद्रकांत खैरे यांनीदेखील घरी असाच उपक्रम केला. लक्ष्मी रस्त्यावरील उंबऱ्या गणपती मंडळानेदेखील असा फलक आपल्या मंडळाजवळ लावले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 22, 2015 3:25 am

Web Title: ganesh mandals help for famine stricken
Next Stories
1 गणपती विसर्जनाला डेक्कन परिसर ‘पॅक’ !
2 घराण्याची शिस्त पाळूनही कलाकाराला स्वातंत्र्य घेता येते – ज्येष्ठ सतारवादक उस्ताद उस्मान खाँ
3 मुठाई नदी महोत्सवास २ ऑक्टोबरपासून प्रारंभ
Just Now!
X