रांजणगाव भागात फसवणूक करणारी टोळी सक्रिय

पुणे : नगर रस्त्यावरील रांजणगाव औद्योगिक वसाहतीतील बडय़ा कंपनीत नोकरीची संधी, दरमहा वीस ते पंचवीस हजार रुपये पगार, राहणे तसेच जेवणाची उत्तम सोय असे संदेश समाजमाध्यमातून प्रसारित केले जातात. पुण्यालगतच्या औद्योगिक वसाहतीत नोकरीची संधी असल्याने राज्यातील वेगवेगळय़ा भागातील युवक नोकरीच्या आशेने रांजणगावात येतात. सुरुवातीचे एक ते दोन दिवस त्यांना दुसऱ्याच ठिकाणी कामाला लावले जाते. त्यांच्याकडून चार ते पाच हजार रुपये उकळले जातात. निकृष्ट प्रतीचे जेवण तसेच निवासाची व्यवस्था पाहून नोकरीच्या शोधात आलेल्या युवकाला एक ते दोन दिवसांत फसवणूक झाल्याचे कळते आणि ठेकेदाराकडे दिलेले पैसे न घेता तो मूळगावी रवाना होतो..

गेल्या काही वर्षांपासून रांजणगावातील औद्योगिक वसाहतीत अनेक मोठय़ा तसेच बहुराष्ट्रीय कंपनीने त्यांचे प्रकल्प सुरू केले आहेत. त्यापैकी गृहोपयोगी वस्तूंची निर्मिती करणाऱ्या एका बडय़ा बहुराष्ट्रीय कंपनीचे प्रकल्प या भागात आहेत. या कंपनीच्या नावाने नोकरीची संधी असल्याचे संदेश गेल्या काही महिन्यांपासून व्हॉट्सअ‍ॅपच्या माध्यमातून प्रसारित केले जात आहेत, तसेच काही वृत्तपत्रांमध्ये छोटय़ा जाहिराती प्रसिद्ध करण्यात येतात.‘रांजणगाव औद्योगिक वसाहतीत नोकरीची संधी, दरमहा १६ ते २४ हजार रुपये पगार, किमान शिक्षण दहावी, बारावी, राहणे तसेच जेवणाची सोय’, असे आमिष जाहिरातीच्या माध्यमातून दाखविण्यात येते. ही जाहिरात वाचून ग्रामीण भागातील अनेक युवक जाहिरातीत दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधतात. या क्रमांकावर संपर्क साधल्यानंतर एक महिला बोलते, ‘तुम्ही रांजणगावला येताना दोन हजार रुपये, दोन छायाचित्रे आणि ओळखपत्र घेऊन या. प्रत्यक्ष बोलू.’असे सांगण्यात येते. असे फसवणुकीच्या प्रकारात बळी पडलेला गडहिंग्लजमधील युवक किसन जाधव याने सांगितले.

तो म्हणाला, ‘रांजणगावला आल्यानंतर एकाच्या मोबाइल क्रमांकावर संपर्क साधण्याची सूचना करण्यात येते. त्यानुसार मी तेथे गेलो. मोबाइल क्रमांकावर संपर्क साधल्यानंतर दहा मिनिटांत एक व्यक्ती तिथे आली. लगेचच कंपनीत रुजू व्हावे लागेल, असे त्या व्यक्तीकडून सांगण्यात येते. तेथून ती व्यक्ती रांजणगाव औद्योगिक वसाहत परिसरातील मोठय़ा कंपनीच्या परिसरात नेते. त्यानंतर दुसरी एक व्यक्ती राहण्याची व्यवस्था दाखविण्यासाठी रांजणगावपासून काही अंतरावर असलेल्या एका गावात नेते. तेथे गेल्यानंतर राहायची व्यवस्था केल्याबद्दल पाचशे रुपये देण्यास सांगते. परगावात असल्याने तसेच राहायची व्यवस्था झाल्याने उमेदवार फारशी कटकट न करता त्याला पाचशे रुपये देतो. खोलीत गेल्यानंतर तेथे नोकरीच्या शोधात असलेले आणखी काही युवक असतात. त्यांच्याकडे मी विचारपूस केली. तेव्हा ते लातूर, धुळे, औरंगाबाद भागातील असल्याचे समजले. त्यापैकी काही जणांकडून तीन ते पाच हजार रुपये घेतल्याची माहिती मिळाली.

तिथे असलेल्या उमेदवारांना आठ दिवसांचे प्रशिक्षण घ्यावे लागेल, असे सांगण्यात येते. त्यानंतर उमेदवारांना दुसऱ्याच एका कंपनीत नेण्यात येते. रात्रभर उमेदवारांकडून काम करून घेण्यात येते. तेथे काम करणारे युवक उत्तर प्रदेश, बिहार राज्यातील आहेत. त्यांच्याकडे चौकशी केली असता तीन ते चार महिने पगार होत नसल्याची तक्रार परप्रांतीय उमेदवारांनी केली. निकृष्ट प्रतीचे जेवण दिले जाते. जे उमेदवार काम करण्यास नकार देतात, त्यांना शिवीगाळ करून धमकावण्यात येते. ज्यांना नोकरी सोडायची असेल त्यांना त्यांचे सामान परत दिले जाते. परगावात असलेले उमेदवार घाबरतात आणि तेथून निघून जाण्याचा निर्णय घेतात. या भागात चौकशी केली असता नोकरीच्या आमिषाने फसवणूक करणारी टोळी रांजणगाव भागात सक्रिय असल्याची माहिती मिळाली. दररोज २५ ते १०० उमेदवार या भागात नोक रीच्या शोधात येतात. त्यांच्याकडून पैसे घेऊन प्रत्यक्षात दुसऱ्या ठिकाणी कामाला लावले जाते,’ असे जाधव याने सांगितले.

रांजणगाव औद्योगिक वसाहतीत नोकरी लावण्याच्या आमिषाने फसवणूक करण्याचे प्रकार वाढले आहेत. समाज माध्यमातून प्रसारित करण्यात येणाऱ्या संदेशांवर उमेदवारांनी विश्वास ठेवू नये. पोलिसांकडे तक्रारी आल्या आहेत. फसवणूक करणाऱ्या टोळीवर कारवाई करण्यात येईल. पोलिसांनी पंधरा दिवसांपूर्वी रांजणगाव औद्योगिक वसाहतीच्या परिसरात फसवणूक करणाऱ्या टोळीपासून सावध रहा, असे फलक लावले आहेत. ज्यांची फसवणूक झाली असेल त्यांनी रांजणगाव एमआयडीसी पोलीस ठाणे (दूरध्वनी-०२१३८२३२१३९) या क्रमांकवर संपर्क साधावा.

– मनोजकुमार यादव, पोलीस निरीक्षक, रांजणगाव एमआयडीसी पोलीस ठाणे