गानवर्धन संस्थेतर्फे प्रसिद्ध संवादिनीवादक सीमा शिरोडकर यांना ज्येष्ठ संवादिनीवादक पं. अप्पासाहेब जळगावकर स्मृती स्वर-लय-रत्न पुरस्कार जाहीर झाला आहे. दहा हजार रुपये आणि मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.
मनोहर मंगल कार्यालय येथे शनिवारी (४ जून) सायंकाळी सहा वाजता होणाऱ्या कार्यक्रमात ज्येष्ठ गायिका पद्मा तळवलकर यांच्या हस्ते त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. पुरस्कार वितरणानंतर सीमा शिरोडकर यांचे स्वतंत्र संवादिनीवादन होणार असून त्यांना विश्वनाथ शिरोडकर तबल्याची साथसंगत करणार आहेत. उत्तरार्धात पं. विनायक तोरवी यांच्या शिष्या कस्तुरी दातार-अत्रावलकर यांचे गायन होणार आहे. त्यांना सुरेश फडतरे संवादिनीची आणि अभय दातार तबल्याची साथ करणार आहेत.
सीमा शिरोडकर यांनी प्रारंभी उमेश इन्सुलकर आणि नंतर ज्येष्ठ संवादिनीवादक पं. तुळशीदास बोरकर यांच्याकडे १५ वर्षे संवादिनीवादनाची तालीम घेतली. आरती अंकलीकर यांच्या सहवासातून त्या गायनाला साथसंगत करण्याचे तंत्र शिकल्या. तर, पं. विश्वनाथ पेंढारकर यांच्याकडून स्वतंत्र वादनातील बारकावे आत्मसात केले. सर्व गुरुंच्या शैलींचा समन्वय साधून रियाज आणि चिंतनातून सीमा शिरोडकर यांनी स्वतंत्र संवादिनीवादन आणि साथसंगतीची शैली विकसित केली. दिग्गज कलाकारांना त्यांनी साथसंगत केली असून तबलावादक विश्वनाथ शिरोडकर यांच्यासमवेत विविध महोत्सवांमध्ये त्यांचे संवादिनीवादन झाले आहे.