ऑनलाइन दर्शनाच्या आवाहनाकडे काणाडोळा

पुणे : शहरातील मानाची मंडळे तसेच प्रमुख मंडळांकडून भाविकांना ऑनलाइन दर्शनाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. मात्र, भाविकांची मध्यभागातील प्रमुख मंडळे, मानाच्या मंडळाच्या ‘श्रीं’च्या दर्शनासाठी गर्दी वाढत असून वाढत्या गर्दीमुळे प्रशासनाला घोर लागला आहे. करोना संसर्गात वाढत्या गर्दीचे नियोजन करण्याचे आव्हान पोलिसांपुढे आहे.

गौरी विसर्जनानंतर पुढील चार ते पाच दिवस मध्यभागात गर्दी वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे पोलिसांकडून गर्दीचे नियोजन करण्यासाठी उपाययोजना करण्यात आल्या आहेत. उत्सवासाठी प्रशासनाकडून नियमावली तयार करण्यात आली आहे. नागरिकांनी गर्दी करू नये. ऑनलाइन दर्शनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन सहपोलीस आयुक्त डॉ. रवींद्र शिसवे यांनी केले.

सीसीटीव्ही कॅमेऱ्यांद्वारे गर्दीवर नजर

मध्यभागातील बेलबाग चौक, हुतात्मा चौक, बाबू गेनू चौक, मंडई, शनिपार, अप्पा बळवंत चौक या भागात गर्दी होत आहे. गर्दीचे नियोजन करण्यासाठी बंदोबस्त ठेवण्यात आला असून सीसीटीव्ही कॅमेऱ्यांद्वारे गर्दीवर नजर ठेवण्यात येत आहे. दर पंधरा मिनिटांनी मध्यभागातील गर्दीची छायाचित्रे वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांकडे पाठविण्यात येत आहेत.

मध्यभागात पोलिसांनी ठिकठिकाणी ध्वनिवर्धक लावले आहेत. ध्वनिवर्धकाद्वारे गर्दी न करण्याचे आवाहन पोलिसांकडून केले जात आहे. हुतात्मा चौक, बेलबाग चौक दरम्यान पादचारी मार्ग टप्प्याटप्प्याने बंद केले जात आहेत. त्यामुळे गर्दीचे नियोजन क रणे शक्य होत आहे. मध्यभागातील गर्दीवर सीसीटीव्ही कॅमेऱ्यांद्वारे नजर ठेवण्यात येत आहे.

– डॉ. रवींद्र शिसवे, सहपोलीस आयुक्त