पुणे ग्रामीणमधील खेड पोलीस ठाण्याच्या सबजेलमधील खिडकीचे लोखंडी गज कापून दोन आरोपींनी पलायन केल्याची खळबळजनक घटना समोर आल्यानंतर गार्ड कमांडर कैलास कड यांचं निलंबन करण्यात आलं आहे. तर, इतर तीन पोलीस कर्मचाऱ्यांच्या विभागीय चौकशी करण्याचे आदेश पुणे पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांनी दिले आहेत. गार्ड कमांडरवर पोलीस कोठडीची जबाबदारी असल्याने कड यांचे तातडीने निलंबन करण्यात आले आहे.

सोमवारी पहाटे चारच्या सुमारास ही घटना घडली. कोठडीच्या बाहेरून आरोपींना त्यांच्या साथीदारांनी मदत केल्याची माहिती समोर येत आहे. या प्रकरणाचा अधिक तपास खेड पोलीस करत असून आरोपींचा शोध सुरू आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, विशाल दत्तात्रय तांदळे (वय २२, रा. मंचर, ता. आंबेगाव, जि. पुणे) आणि राहुल देवराम गोयेकर (वय २६, रा. गोयेकरवाडी, ता. कर्जत, जि. अहमदनगर) अशी या फरार आरोपींची नावे आहेत. तीन महिन्यांपूर्वी या दोघांनी एका ट्रक चालकाला लुटले होते. याच प्रकरणात त्यांना १६ ऑक्टोबर रोजी रात्री पावणे दहाच्या सुमारास खेड पोलिसांनी अटक केली होती. दुसऱ्या दिवशी आरोपींना याप्रकरणी न्यायालयात हजर करण्यात आले होते. त्यानंतर कोर्टाने दोघांना २० तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली होती. मात्र, या काळात तपासादरम्यान त्यांनी आणखी जबरी चोरीचे गुन्हे केल्याचे निष्पन्न झाल्याने त्यांना पुन्हा न्यायालयात हजर करण्यात आले. त्यानंतर त्यांची कोठडी २२ ऑक्टोबरपर्यंत वाढवण्यात आली. दरम्यान, सोमवारी पहाटे त्यांनी खेड पोलीस ठाण्याच्या सबजेलमधील खिडकीचे लोखंडी गज तोडून पलायन केले. या सबजेलच्या आत तीन पोलीस कर्मचारी तैनात असतात. त्यांना गज कापताना आवाज आला नाही का? असा प्रश्न देखील उपस्थित होत आहे. विशेष म्हणजे या सबजेलच्या बाहेरून कोणतीच सुरक्षा नाही. एक पोलीस कर्मचारी देखील या परिसरात फिरकत नाही. या प्रकरणामुळे आरोपींचा शोध घेण्यासाठी खेड पोलिसांची धावपळ सुरू झाली आहे.