जनआरोग्य अभियानातर्फे मार्गदर्शक तत्त्वे

पुणे :  करोना विषाणू संसर्गाचा विळखा घट्ट होत असताना पुणे जिल्हा प्रशासनातर्फे घराबाहेर पडणाऱ्या व्यक्तींसाठी मास्क वापरणे बंधनकारक करण्यात आले आहे. त्याच पार्श्वभूमीवर जन आरोग्य अभियानातर्फे मार्गदर्शक सूचना प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत. डॉक्टर, परिचारिका आणि वैद्यकीय कर्मचाऱ्यांनी कोणती संरक्षक साधने वापरावीत, सर्वसामान्य नागरिकांनी मास्कचा वापर कसा करावा, याबाबत सूचना यावेळी तज्ज्ञ डॉक्टरांकडून करण्यात आल्या आहेत.

कोणत्याही प्रकारचा मास्क वापरल्याने विषाणू संसर्ग होणे थांबवता येत नाही, मात्र त्याला काही प्रमाणात रोखणे शक्य होते. करोना विषाणू संसर्ग हा खोकताना किंवा शिंकताना उडणाऱ्या तुषारांतून पसरत असल्यामुळे मास्कचा वापर करणे सुरक्षित ठरते. त्यामुळे सद्यस्थितीत मास्कची गरज सर्वांसाठीच आहे. मात्र डॉक्टर, परिचारिका आणि वैद्यकीय कर्मचारी अशा रुग्णांच्या संपर्कात येणाऱ्या व्यक्तींसाठी सर्जिकल प्रकारातील मास्क राखीव ठेवावेत. हे मास्क एकदा वापरल्यानंतर त्यांची विल्हेवाट लावणे आवश्यक ठरते. रुग्णालयाचे सुरक्षा रक्षक, स्वागत कक्षातील कर्मचारी हे अल्पकाळ रुग्णांच्या संपर्कात येतात. त्यामुळे त्यांनी साधा कापडी मास्क वापरला तरी ते पुरेसे ठरते.

हा मास्क दररोज गरम पाण्याने धुवून, वाळवून वापरणे शक्य आहे. घरोघरी फिरून रुग्णांचे सर्वेक्षण तसेच जनजागृती करणाऱ्या आशा सेविका, अंगणवाडी किंवा आरोग्य कर्मचारी यांनी देखिल कापडी मास्क वापरण्यास प्राधान्य द्यावे. अतिदक्षता विभाग तसेच प्रत्यक्ष करोना संसर्गाच्या रुग्णांच्या सहवासात येणाऱ्या डॉक्टर, परिचारिका, तंत्रज्ञ आणि सेवकांनी संपूर्ण पीपीई किटचा वापर करावा. प्लास्टिक शील्ड मास्क तसेच एन ९५ मास्क वापरावे. कव्हर ऑल प्रकारचा संपूर्ण पोषाख वापरणे अत्यावश्यक आहे.

मास्कचा वापर करताना हात साबणाने धुवून मास्क लावल्यावर शेवटपर्यंत त्याला परत परत हात लावू नये. बाहेरून घरी आल्यानंतर आंघोळ करावी, कपडे धुवावेत म्हणजे कुटुंबातील इतरांना धोका उद्भवणार नाही.