News Flash

‘गुटखा बंदी’ केवळ नावापुरती

हप्तेखोरी, पोखरलेल्या यंत्रणेमुळे राजरोस विक्री

पुण्यात दरमहा पाचशे कोटींची उलढाल; हप्तेखोरी, पोखरलेल्या यंत्रणेमुळे राजरोस विक्री

काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी सरकारच्या काळात महाराष्ट्रात गुटखा बंदी करण्यात आली. गुटखाबंदी झाल्यानंतर सुरुवातीला काही काळ गुटखा उत्पादक धास्तावले होते. मात्र, गुटखा उत्पादक, विक्रेत्यांनी समांतर व्यवस्था उभी करून बेकायदा गुटखाविक्रीचे जाळे निर्माण केले. परराज्यातील गुजरात आणि कर्नाटक भागातून पुण्यात गुटखा विक्रीसाठी पाठविला जातो. हप्तेखोरी, पोखरलेल्या यंत्रणेमुळे गुटखा विक्री राजरोस सुरू असून एकटय़ा पुणे शहर परिसरात बेकायदा गुटखा विक्रीतून पाचशे कोटींची उलढाल दरमहा होत असल्याची माहिती पुढे आली आहे.

आघाडी सरकारने गुटखा बंदी लागू केली. शालेय, महाविद्यालय विद्यार्थ्यांमध्ये गुटखा सेवनाचे प्रमाण मोठय़ा प्रमाणावर होते.त्यामुळे गुटखा बंदी लागू करण्यासाठी आघाडी सरकारने प्रयत्न  केले. त्या वेळी अनेक गुटखा उत्पादकांनी राज्य सरकारावर दबाब आणण्याचा प्रयत्न केला होता. न्यायालयाने गुटखा बंदी लागू करण्याचे आदेश दिले. त्या वेळी राज्य सरकारने गुटखाविक्रीतून मिळणाऱ्या कोटय़वधी रुपयांचा महसुलावर पाणी सोडले होते. गुटखा बंदीला पाच वर्ष झाली आहेत. मात्र, प्रत्यक्षात वेगळीच परिस्थिती आहे. गुटखा बंदी नावापुरती आहे. खेडापाडय़ापासून ते मोठय़ा शहरात गुटखा सहजपणे उपलब्ध होते. गुटखा उत्पादक, बेकायदा वितरक, विक्रेते यांनी गुटखा विक्रीची समांतर यंत्रणा उभी केली आहे. पोलीस तसेच अन्न व औषध प्रशासन विभागातील काही अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी गुटखा विक्रीचे जाळे निर्माण केल्याचे एका गुटखा वितरकाने सांगितले.

हवालामार्फत व्यवहार; नाशिकमधील व्यापारी सामील

पुण्यातील गुटखा विक्रीत नाशिकमधील ‘सुनील’नावाच्या व्यापारी सामील आहे. त्याला पुण्यातील वितरक हवालामार्फत पैसे पाठवितात. तेथून गुजरातमधून गुटखा नाशिकमार्गे पुण्यात विक्रीसाठी पाठविला जातो. गुजरातमधील दोन बडय़ा वाहतूकदारांकडून चाकण, कोंढवा आणि कात्रजमधील मांगडेवाडीत कंटेनरने गुटखा विक्रीसाठी पाठविला जातो. तेथून गुटख्याचे पुडे शहरातील उपनगरातील किरकोळ विक्रेत्यांकडे पाठविले जातात. फेरीवाले त्यांच्याकडून गुटखा खरेदी करून पानपट्टीचालकांना विकतात. पुणे शहरात दररोज चार ते पाच कंटेनरमधून गुटखा विक्रीसाठी पाठविला जातो. एका कंटनेरमधून साधारणपणे पन्नास लाखांचा माल विक्रीसाठी पाठविला जातो. पुण्यातील गुटखा विक्रीचा हिशोब केल्यास दरमहा पाचशे कोटी रुपयांची उलढाल होते.

कारवाई नावापुरती; हप्तेखोरीमुळे यंत्रणा पोखरलेली

गुटखा बंदीचा आदेश नावापुरता आहे. जुजबी कारवाई करून गुटखा विक्रेते आणि उत्पादकांमध्ये दहशत निर्माण करायची आणि त्या बदल्यात गुटखा उत्पादकांकडून हप्ते घ्यायचे. पोलीस तसेच अन्न व औषध विभागातील काहींच्या छुप्या पाठिंब्यावर पुणे, मुंबई तसेच राज्यभरात गुटखा विक्रीचे जाळे निर्माण करण्यात आले आहेत. हप्तेखोरीमुळे संपूर्ण यंत्रणा पोखरली असून गुटखा बंदी कागदावर असल्याची माहिती गुटखा विक्रेत्यांकडून देण्यात आली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 21, 2018 2:27 am

Web Title: gutkha bandi issue in pune
Next Stories
1 पुण्यात वर्षभरात लोहमार्गावर ५४० मृत्यू!
2 ‘महाराष्ट्र दिन’ श्रमदानाने साजरा करावा
3 दीड लाख महिलांना प्रशिक्षण, ४० कोटींचा खर्च
Just Now!
X